ज्वारी, बाजरी, गहू, डाळी, कडधान्ये अशा जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्य मेटाकुटीस आले असताना पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ करत तेलकंपन्यांनी महागाईला आणखी फोडणी दिली. शुक्रवारी मध्यरात्रीपासून पेट्रोलच्या दरात लिटरमागे दीड रुपये तर डिझेलच्या दरात लिटरमागे ४५ पैशांची वाढ करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या वाढत्या किमतींच्या तुलनेत देशांतर्गत पेट्रोलचे दर वाढवण्यात आले असून डिझेलच्या दरात ठरावीक कालावधीत किरकोळ वाढ करण्याच्या धोरणानुसार त्याचे दर वाढवण्यात आल्याचे तेलकंपन्यांतील सूत्रांनी सांगितले. ही दरवाढ स्थानिक विक्रीकर किंवा व्हॅट गृहित न धरता करण्यात आली असून प्रत्यक्षात पेट्रोल-डिझेलसाठी ग्राहकांना जाहीर दरवाढीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
गेल्या महिन्यात, १८ जानेवारीला पेट्रोलचे दर लिटरमागे ३० पैशांनी कमी करण्यात आले होते. त्याचवेळी डिझेलवरील किमतीचे नियंत्रण अंशत: हटवून त्यात ठरावीक अंतराने किरकोळ वाढ करण्याचा निर्णय घेतला होता.
गेल्या महिन्याभरात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ११३.२४  डॉलरवर पोहोचल्या असून पेट्रोलचे दर ११९.५९ डॉलरवरून १२८.५७ डॉलरवर पोहोचले आहेत. त्यामुळे दरवाढ अपरिहार्य होती, असे इंडियन ऑइल कॉपरेरेशनने म्हटले आहे. डिझेलच्या दरातही त्यामुळेच वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Story img Loader