लग्नासाठी मुलगी मिळत नाही, ही समस्या फक्त महाराष्ट्रच नाही तर देशातील अनेक भागातील तरुणांना सतावत आहे. रोजगार, कमी पगार, वाढलेल्या अपेक्षा यामुळं लग्नाळू मुलांना मुलगी मिळत नाही. उत्तर प्रदेशच्या महोबा येथे एका पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचेही लग्न जमत नाही. लग्नाच्या विवंचनेत असलेल्या या तरुणासमोर अचानक भाजपा आमदार आले आणि तरुणाने वेळ साधून थेट आमदारांना लग्न लावून देण्याची गळ घातली. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजपचे आमदार ब्रजभूषण राजपूत आपल्या गाडीत पेट्रोल भरण्यासाठी पंपावर आले होते. यावेळी कर्मचाऱ्याने संधी साधून आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली.

हे वाचा >> एक खोली, बाथरूम, महिन्याचं भाडं फक्त एका वडापाव एवढंच; कुणालाच बसत नाहीये विश्वास, फोटो बघाल तर म्हणालं असं घर हवं

व्हिडीओमध्ये काय दिसले?

भाजपा आमदार ब्रजभूषण राजपूत हे एका पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या गाडीसमोर एक व्यक्ती हात जोडून उभा असल्याचे दिसले. या व्यक्तीचे काहीतरी काम असावे, असा अंदाज बांधून आमदारांनी त्याच्याशी संवाद सुरू केला. मात्र जेव्हा त्याची अडचण ऐकली, तेव्हा आमदारांनाही हसू आवरलं नाही. सदर व्यक्ती आपलं लग्न होत नसल्याची व्यथा घेऊन त्यांच्याकडे आला होता.

“मी तुम्हाला मत दिलं आहे. तुम्ही आता माझे लग्न लावून द्या. माझ्यासाठी एक नवरी शोधा”, अशी विनंती सदर कर्मचाऱ्याने केल्यानंतर आमदारही हैराण झाले. आमदार यावेळी म्हणाले की, माझ्याशिवाय अजून कुणाला लग्नासाठी मदत मागितली. यावर सदर कर्मचारी म्हणाला की, तुमच्याविरोधात निवडणूक लढविलेल्या गोस्वामी यांच्याकडेही मी लग्नासाठी मदत मागितली होती. यानंतर आमदार ब्रजभूषण राजपूत यांनी त्याला त्याचा पगार विचारला. यावर कर्मचारी म्हणाला की, त्याला महिन्याला सहा हजार रुपये इतके वेतन आहे. त्याच्याकडे १३ बीघा जमीन आहे.

हे ही वाचा >> मत मागण्यासाठी आमच्या चाळीत पाय ठेवू नये… वरळी बीडीडी चाळीत झळकले फलक, रहिवाशांचा मतदानावर बहिष्कार

कर्मचाऱ्याचा पगार आणि संपत्ती ऐकल्यानंतर आमदार म्हणाले, “तू बऱ्यापैकी श्रीमंत आहेस. तुझे लग्न आता आम्ही लावून देऊ.” सदर व्हिडीओ सोशल मीडियावर अचानक व्हायरल होत आहे. मात्र त्याचा निश्चित वेळ कधी आहे? याची कुणालाही कल्पना नाही.