डिझेलवर चालणाऱ्या कारमध्ये पेट्रोल भरणाऱ्या पेट्रोल पंपचालकाला दिल्ली राज्य ग्राहक तक्रार न्यायालयाने २४ हजार रुपयांचा दंड केला आहे.
दिल्लीतील मट्टा ऑटोमोबाइल्स या पेट्रोल पंपावर २६ जून २००७ रोजी ब्रिजमोहन हे वाहनचालक आपली गाडी डिझेल भरण्यासाठी घेऊन गेले होते. मात्र पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याने चुकून गाडीत डिझेलऐवजी पेट्रोल भरले. चुकीचे इंधन भरले गेल्याने गाडी बंद पडली आणि नंतर इंजिनाच्या दुरुस्तीसाठी ब्रिजमोहन यांना तब्बल ३९ हजारांचा खर्च आला. त्यानंतर ब्रिजमोहन यांनी पेट्रोल पंपाविरोधात जिल्हा ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली.
पेट्रोल पंपाच्या मालकाने या प्रकरणी आपली जबाबदारी झटकताना गाडीत इंधन भरले जात असताना वाहनचालकाने दक्ष राहावयास हवे होते, असा उलट दावा केला. मात्र ग्राहक न्यायालयाने त्याचे म्हणणे फेटाळून लावले आणि इंजिन दुरुस्तीच्या खर्चाची निम्मी म्हणजे २० हजारांची रक्कम त्याने तक्रारदाराला द्यावी, असा आदेश दिला. त्याचबरोबर ३ हजार रुपये नुकसानभरपाई आणि १ हजार रुपये खटल्याचा खर्च असे एकूण २४ हजार रुपये तक्रारदाराला देण्याचा आदेश दिला.
न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात पेट्रोल पंपचालक दिल्ली राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे दाद मागितली. मात्र आयोगानेही जिल्हा ग्राहक न्यायालयाचा निकाल कायम ठेवला.

Story img Loader