अमेरिकेच्या साथ रोग नियंत्रण आणि प्रतिबंध (CDC) तसेच अन्न व औषध प्रशासन (FDA) या दोन संस्थांनी शुक्रवारी एक धक्कादायक माहिती दिली. अमेरिकेची लस उत्पादक कंपनी Pfizer Inc आणि जर्मनीची लस उत्पादक कंपनी BioNTech यांनी उत्पादिक केलेल्या बायव्हॅलेंट (Bivalent) करोना लशीमुळे वृद्धांमध्ये ब्रेन स्ट्रोकचा धोका निर्माण होऊ शकतो, असे दोन्ही संस्थांनी सांगितले आहे. तरिही सीडीसीने या दोन्ही लशी देण्यासाठी हिरवा झेंडा देखील दाखवला आहे, अशी माहिती सीएनएन या वृत्तसंस्थेने दिली आहे.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या सीडीसी संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सदर विश्लेषण सुरुवातीच्या काळात आलेल्या आकडेवारीवरुन काढले होते. सीडीसीच्या सुरक्षा देखरेख प्रणालीने (safety monitoring system) ज्या आकडेवारीचा अभ्यास केला, त्यानुसार ६५ किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या ज्या लोकांनी पीफायजर किंवा बायोएनटेक लस घेतली त्या लोकांना २१ दिवसांनंतर इस्केमिक स्ट्रोकचा धोका उद्भवला होता.
इस्केमिक स्ट्रोक आणि बायव्हॅलेंट लस म्हणजे काय?
मेंदूला रक्त पुरविणाऱ्या धमण्यांमध्ये काही अडथळा निर्माण झाल्यास इस्केमिक स्ट्रोक येतो. यालाच ब्रेन इस्केमिया या नावानेही ओळखले जाते. तर बायव्हॅलेंट लस ही करोना विषाणूचा मूळ स्ट्रेन आणि ओमिक्रॉन व्हेरियंट यांच्यातील घटकांना एकत्र करुन तयार करण्यात आली आहे. बायव्हॅलेंट लशीमुळे विषाणू विरोधात लढण्यासाठी अधिक सुरक्षा मिळते. दोन विषाणूंचे घटक वापरले गेल्यामुळे त्याला बायव्हॅलेंट लस म्हटले जाते.
फायजर आणि बायोएनटेकने भूमिका मांडली
सीडीसीने दिलेल्या माहितीनंतर दोन्ही कंपन्यांच्यावतीने त्यांची भूमिकां मांडण्यात आली आहे. सीडीसीच्या सुरक्षा प्रणाली आणि एफडीएने काढलेल्या निष्कर्षाला दुजोरा मिळेल असा कोणताही पुरावा सादर केलेला नाही. त्यामुळे या लशींमुळेच इस्केमिक स्ट्रोक होतो, याला कोणताही आधार नाही, असे दोन्ही कंपन्यांच्यावतीने सांगण्यात आले आहे.