ताशी २०० कि.मी. वेगाने आलेल्या पायलिन महाचक्रीवादळाने शनिवारी रात्री ओदिशाच्या गोपालपूरला तडाखा दिला असून हे वादळ झपाटय़ाने आगेकूच करीत आहे. यावेळी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने मात्र ठोस पावले उचलून लाखो लोकांना सुरक्षित स्थळी हलवले असल्याने या वादळात वित्तहानी मोठी होणार असली तरी जीवितहानी आटोक्यात राहण्याची शक्यता आहे. १९९९मध्ये आलेल्या अशाच वादळाने तब्बल १० हजार लोक मृत्युमुखी पडले होते. त्या पाश्र्वभूमीवर या वादळाला तोंड देण्यात पहिल्या फेरीत तरी यंत्रणा यशस्वी ठरल्याचे दिसत आहे.
*०६ तास वादळाचा जोर तीव्र -हवामान खाते.
*७.२४ लाख ओदिशावासींना सुरक्षित स्थळी हलवले.
*०१लाख आंध्रवासींना सुरक्षित स्थळी हलवले.
*०५मृत्युमुखी. वादळाआधी  झाडे उन्मळून जीवितहानी
*१६३ रेल्वेगाडय़ा रद्द,  अनेक विमानेही रद्द
वादळ  तडाखा: नैसर्गिक आपत्तीच्या तीव्रतेने सर्वसामान्यांचे प्रचंड हाल
ताशी २०० पेक्षा अधिक किलोमीटरच्या वेगाने घोंघावणाऱ्या चक्रीवादळाने अखेरीस ओदिशा व आंध्र प्रदेशात रात्री उशिरा पाय रोवले असून या दोन्ही राज्यांमध्ये अनेक ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडत आहे. वेगाने आलेले वादळ आणि त्यातच पडणारा मुसळधार पाऊस यामुळे सर्वसामान्यांच्या हालांना पारावार राहिलेला नाही. ओदिशातील गंजम जिल्ह्यात या चक्रीवादळाने आपले रौद्र स्वरूप दाखविले असून त्या परिसरात वाहणाऱ्या सोसाटय़ाच्या वाऱ्यांनी अनेक ठिकाणी वृक्ष जमीनदोस्त झाले आहेत.
पायलिनमुळे किनारी प्रदेशात जोरात पाऊस होण्याबरोबरच शनिवारी सकाळपासूनच ताशी ७० कि.मी. वेगाने वारे वाहत होते, त्यामुळे विजेचे खांब व झाडे उखडली गेली. ओडिशा सरकारने सहा किनारी जिल्ह्यातील अडीच लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले असून हे काम अजून सुरूच आहे. त्यातील एक लाख लोकांना गोपाळपूर येथील सुरक्षित ठिकाणी नेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
वादळ वायव्येकडे सरकत असून उत्तरेकडून ते आंध्र प्रदेश व ओडिशाचा किनारा, कलिंगपट्टनम व पारादीप येथून ओलांडून गोपाळपूरला येईल व त्याच्या वाऱ्याचा वेग ताशी २१० ते २२० कि.मी असेल. गंजम, पुरी, खुर्दा, जगतसिंगपूर व केंद्रपारा या जिल्ह्य़ात सागराला मोठी भरती येण्याची शक्यता आहे. बालासोर, भद्रक या जिल्हयात अतिदक्षतेचा इशारा ओडिशाचे पुनर्वसन आयुक्त पी.के. मोहपात्रा यांनी दिला आहे.
आंध्र प्रदेशात ५२ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून श्रीकाकुलम येथे २५ हजार लोकांना वादळ बचाव छावण्यात हलवले आहे. काल दक्षिणेकडील श्रीकाकुलम, विजयनदरम, विशाखापट्टनम येथील ६४ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. विजयनगरमचे जिल्हाधिकारी कांतिलाल दांडे यांनी सांगितले की, धोक्याच्या भागात राहणाऱ्या १५ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. पूर्व गोदावरी जिल्ह्य़ात मच्छीमारांना हलवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून उप्पडा व काकिनाडा येथे हे प्रयत्न सुरू आहेत. पाटबंधारे खात्याचे अधिकारी किनारी जिल्ह्य़ात पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवून आहेत. रात्री या वादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून येत्या ७२ तासात मच्छीमारांनी सागरात जाऊ नये असे सांगण्यात आले आहे. काकिनाडा, रामचंद्रपुरम, अमलापुरम येथे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. आंध्र प्रदेशात १३ विशेष अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात केले आहेत. नौदल व तटरक्षक दलाचे जवानही काम करीत आहेत.
पायलिन वादळाचा तडाखा बसणार असल्याने भुवनेश्वरहून सर्व विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले असून, महामार्गावरील वाहतूकही ठप्प झाली आहे. एअर इंडिया, इंडिगो आणि जेट एअरवेजच्या १० विमानांची उड्डाणे आणि आगमन रद्द करण्यात आले आहे. खराब हवामानामुळे खासगी एअरलाइन्सनेही आपली उड्डाणे रद्द केली आहेत.
दरम्यान, हावडा आणि विशाखापट्टणम या दरम्यानच्या सर्व रेल्वेगाडय़ा रद्द करण्यात आल्या असून, स्थितीची संपूर्ण पाहणी केल्यानंतर सर्व मेल-एक्स्प्रेस आणि विशेष गाडय़ाही रद्द केल्या आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे रेल्वेमार्ग, सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर्स आदींच्या दुरुस्तीचे काम तातडीने होण्यासाठी पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे डिझेल इंजिनही आणि मदतकार्य गाडय़ाही तैनात ठेवण्यात आल्या आहेत. पुरी येथे तिष्ठत राहावे लागलेल्या जवळपास ७०० प्रवाशांना रेल्वे कल्याण मंडप येथे ठेवण्यात आले आहे.
छत्तीसगडमध्येही इशारा
रायपूर : बस्तरचा दक्षिणेकडील भाग आणि रायपूर या क्षेत्राला मुसळधार पाऊस आणि वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने छत्तीसगड सरकारने सर्व खात्यांना सज्जतेचे आदेश दिले आहेत.
येत्या ४८ तासांत तुफान वृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
वादळाचा तडाखा बसण्याच्या पाश्र्वभूमीवर गृह, ऊर्जा, जलसंसाधन, आपत्कालीन व्यवस्थापन, महसूल आणि अन्य विभागांना सज्जतेचे आदेश देण्यात आले आहेत.  
धमतारी जिल्ह्य़ातील गांगरेल धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. हे धरण सध्या भरलेले असून मुसळधार पावसाने ते अधिकच भरण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
आंध्र प्रदेश आणि ओदिशाच्या सीमेवरील जिल्हाधिकाऱ्यांना मदतकार्यासाठीच्या आराखडय़ास  सज्जतेचे आदेश देण्यात आले आहेत. सोसाटय़ाच्या वाऱ्यांपासून बचाव व्हावा यासाठी हेलिकॉप्टर जगदाळपूर आणि अन्य ठिकाणी ठेवण्यात आली आहेत, असे सांगण्यात आले.
प. बंगालमध्ये पथके सज्ज
कोलकाता : ओदिशाला वादळाचा तडाखा बसणार असल्याने खबरदारीचे उपाय म्हणून पश्चिम बंगाल सरकारने आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवली असून तटवर्ती क्षेत्रात नागरी दल तैनात करण्यात आले आहे.
दिघा, शकरपूर, कोनताई, मंदारमोनी, डायमंड हार्बर, आणि सुंदरबनच्या काही भागांत आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सज्ज  ठेवली असल्याचे आपत्कालीन व्यवस्थापनमंत्री जावेद खान यांनी सांगितले.  दिघा, मंदारमोनी आणि संकरपूर येथील नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. राज्याच्या मुख्यालयातून हेल्पलाइनही कार्यान्वित करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.
पूर्व आणि पश्चिम मिदनापूर, उत्तर-दक्षिण २४ परगणा, हावडा, हुगळी, बंकुरा, बर्दवान आणि पुरुलिया आदी जिल्ह्य़ांमध्ये येत्या ४८ तासांत मुसळधार ते अति मुसळधार वृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
काय आहे पायलिन
पायलिन हे तीव्र चक्रीवादळ पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात तयार झाले आहे. नंतर ते वायव्येकडे पारादीप व आग्नेयेकडे पारादीप, पूर्व-आग्नेयेकडे विशाखापट्टणमकडे गेले. अंदमान सागरातील कमी दाबाच्या पट्टय़ाने तयार झालेल्या या वादळाचा फटका ओदिशा व आंध्रला बसणार असून त्याचा वेग त्यावेळी ताशी १७५ ते १८५ कि.मी असेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.