Ph.D Bhajiwala in Punjab : चार विषयात मास्टर्स पदवी, कायद्याच्या विषयात पी.एडी. असल्यानंतर कोणताही व्यक्ती गल्लेलठ्ठ पगाराची नोकरी करत आरामात जीवन व्यतीत करेल. मात्र देशातील बेरोजगारीचे चित्र इतके भीषण आहे की, इतक्या पदव्या मिळवूनही नोकरीचा काही पत्ता नाही. कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी परिणामी देशातील तरूणांनावर भाजीचा गाडा चालविण्याची वेळ येत आहे. अशीच वेळ आलीये पंजाबच्या डॉ. संदीप सिंग यांच्यावर.
३९ वर्षांचे डॉ. संदीप सिंग पटियालाच्या पंजाब विद्यापीठात कंत्राटी प्राध्यापक होते. मात्र काही परिस्थिती निर्माण झाली की, त्यांना नोकरी सोडावी लागली. त्यानंतर त्यांना कुटुंबाचा खर्च भागविण्यासाठी भाजीपाला विकावा लागत आहे. याबद्दलची बातमी एनडीटीव्हीने दिली आहे.
हे वाचा >> PM Modi Interview: बेरोजगारी, महागाईच्या समस्येचं काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात…
डॉ. संदीप सिंग ११ वर्ष पंजाब विद्यापीठातील विधी विभागात कंत्राटी प्राध्यापक होते. त्यांनी विधी विषयात पी.एचडी. केली आहे. तसेच पंजाबी भाषा, पत्रकारिता, राज्यशास्त्र आणि महिला विषयक अभ्यास अशा चार पदवी संपादन केल्या आहेत. अजूनही त्यांचा अभ्यास सुरू आहे. कंत्राटी पद्धतीवर काम करत असताना अनियमित वेतन, त्यातही होणारी कपात अशा समस्यांचा सामना करून वैतागलेल्या संदीप सिंग यांनी नोकरीला राम राम ठोकला.
“वेळेवर कधीच वेतन मिळत नाही. जे वेतन मिळते, त्यातही कपात केली जाते. एवढ्या तुटपुंज्या रकमेत घरखर्च भागवणे अवघड झाले आहे. यासाठी मी भाजी विकण्याचा निर्णय घेतला”, अशी खंत डॉ. संदीप सिंग यांनी व्यक्त केली.
आणखी वाचा >> आरक्षण नव्हे, बेरोजगारी हाच मूळ प्रश्न..
डॉ. संदीप सिंग यांच्या भाजीच्या गाड्यालाच ‘पी.एचडी भाजीवाला’ असा बोर्ड लावला आहे. हा गाडा गल्लीबोळात नेऊन ते भाजी विकतात. त्यामुळे ते परिसरात चर्चेचा विषय ठरले आहेत. संदीप सिंग म्हणाले की, भाजी विकून त्यांना जेवढे पैसे मिळतात, तेवढे तर कंत्राटी प्राध्यापक असतानाही मिळत नव्हते. भाजी विकून झाल्यावर ते घरी जातात आणि पुढील शिक्षणाचा अभ्यास करतात. प्राध्यापकाच्या कामातून ते बाजूला झाले असले तरी त्यांच्यातील अभ्यासू विद्यार्थी अजूनही जागा आहे. भाजी विकून जे पैसे येतात, त्यातून ते बचत करतात. या पैशातून त्यांना भविष्यात ट्यूशन सेंटर उघडायचे आहे.