Donald Trump Bullet shot Viral Photo : अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि यंदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी (१३ जुलै) एका प्रचारसभेत बोलताना गोळीबार करण्यात आला. गोळी ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली. या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले. गोळी कानाजवळून चाटून गेल्याने त्यांना जखम झाली आणि त्यांचा चेहरा रक्ताने माखला होता. गोळीबार होताच त्यांचे अंगरक्षक व सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी एक कडं तयार करून ट्रम्प यांना व्यासपीठावरून सुरक्षित ठिकाणी नेलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या तरुणाला सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी कंठस्नान घातलं आहे. हा हल्लेखोर ट्रम्प यांची प्रचारसभा जिथे चालू होती त्या मैदानाच्या बाजूलाच असलेल्या एका इमारतीच्या छतावर रायफल घेऊन दबा धरून बसला होता. ट्रम्प यांच्या भाषण सुरू झाल्यानंतर काही वेळाने त्याने चार गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली, तर दुसरी त्यांच्या डोक्याच्या जवळून गेली.
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प हे पेन्सल्व्हेनियामध्ये आयोजित एका प्रचार रॅलीत सहभागी झाले होते. ट्रम्प या रॅलीला उपस्थित असलेल्या लोकांना संबोधित करत असतानाच बंदुकीच्या गोळीचा आवाज आला अन् पुढच्याच क्षणी डोनाल्ड ट्रम्प खाली कोसळले. तसेच हल्लेखोराने आणखी तीन गोळ्या झाडल्याचा आवाज आला. मात्र सुरक्षारक्षकांनी ट्रम्प यांना यातून सुखरूप वाचवलं. हा हल्ला अमेरिकन सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणेचं मोठं अपयश असल्याची टीका होत आहे. दरम्यान, हल्लेखोराने झाडलेली एक गोळी ट्रम्प यांच्या डोक्याच्या दिशेने जात असलेला एक फोटो व्हायरल होत आहे. न्यूयॉर्क टाईम्सचे छायाचित्रकार डग मिल्स यांनी हे छायाचित्र टिपलं आहे.
पेन्सल्व्हेनियात नेमकं काय घडलं?
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार ट्रम्प यांची प्रचारसभा चालू असताना चार वेळा गोळीबाराचा आवाज आला. गोळीबाराचा आवाज ऐकून सर्वजण खाली बसले. ट्रम्प यांच्या कानाला काहीतरी लागलं, त्यांनी कानाला हात लावताच त्यांच्या हाताला रक्त लागलं, तेही खाली वाकले. त्यानंतर ट्रम्प यांचे अंगरक्षक आणि सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी ट्रम्प यांच्याभोवती कडं तयार केलं. हे सर्व जवान ट्रम्प यांना घेऊन व्यासपीठावरून उतरले. मात्र व्यासपीठावरून उतरताना ट्रम्प जवानांच्या कड्यामधून बाहेर टोकावून लोकांना अभिवादन करत होते, घोषणा देत होते.
हे ही वाचा >> “डोनाल्ड ट्रम्प यांचा जीव वाचवत भगवान जगन्नाथाने केली परतफेड”, राधारमण दासांनी सांगितला ४८ वर्षांपूर्वीचा प्रसंग
हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया
या गोळीबारानंतर ट्रम्प यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “माझ्यावरील गोळीबारावर जलद प्रतिसाद दिल्याबद्दल युनायटेड स्टेट्स सिक्रेट सर्व्हिस आणि कायदा अंमलबजावणी पथकाचे आभार मानतो. आपल्या देशात अशा प्रकारची घटना घडणं अविश्वसनीय आहे.” दरम्यान, सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी हल्लेखोराला ठार केलं आहे.