तुम्ही आजवर अनेक थरारक हॉलिवूड आणि बॉलिवूड चित्रपट पाहिले असतील. पण एखादी घटना वास्तवात घडत असेल आणि कुणी देवदूत बनून आलं तर तुम्हाला खरं वाटणार नाही. पण अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये चित्रपटातील दृश्य खरं झाल्याचं पाहायला मिळालं. फ्लोरिडातील आकाशात झेप घेतलेल्या विमानाच्या पायलटची प्रकृती अचानक बिघडली आणि तो बेशुद्ध झाला. तेव्हा एका प्रवाशाने विमान कसे उडवायचे माहिती नसतानाही ७० मैलांपर्यंत विमान चालवलं. इतकंच नाही तर सुरक्षितरित्या लँडिंगही केलं. प्रवाशाने हवाई वाहतूक नियंत्रकांच्या मदतीने विमान उतरवण्यात यश मिळवले. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने दिलेल्या माहितीनुसार पायलट आणि दोन प्रवाशी विमानात होते. या प्रवाशाची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे.
ही घटना मंगळवारी घडली. फ्लोरिडामधील पाम बीच आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उत्तरेला १४ आसनी सेसना कारावॅन विमान सुमारे ७० मैलांवर असताना पायलट अचानक आजारी पडला आणि बेशुद्ध झाला. विमानातील एका प्रवाशाने याची माहिती हवाई वाहतूक नियंत्रकाला दिली. प्रवासी आणि नियंत्रक यांच्यातील वायरलेस ऑडिओ समोर आला आहे. यामध्ये प्रवासी रेडिओवर नियंत्रकासोबत संवाद साधत आहे, ‘आम्ही संकटात आहोत. आमचा पायलट बेशुद्ध झाला आहे. यानंतर नियंत्रकाने त्यांना विमान उडवण्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितलं की, “विमान उडवणं तर सोडा मी कधी कॉकपिटमध्येही प्रवेश केला नाही, मात्र माझ्यासमोर फ्लोरिडाचा किनारा दिसतो आहे.” असं सांगितल्यानंतरही नियंत्रकाने त्याला विमानाचं स्टेअरिंग हाती घेण्यास सांगितलं. तसेच विमान चालवण्याबाबत सूचना दिल्या. त्या सूचनांचं अनुसरण करत विमान हवेत उडतं ठेवलं. त्यानंतर विमान पाम बीच विमानतळापासून सुमारे२५ मैल अंतरावर दिसले. यानंतर त्याला लँडिंगबाबत माहिती देण्यात आली.
पाम बीच विमानतळावर विमानाच्या लँडिंगसाठी नियंत्रकाने बाकीची विमाने आकाशात उंचावर थांबवली होती. यामुळे इतर पायलट संभ्रमात होते. नंतर एका विमानाच्या पायलटने कारण विचारले असता, नियंत्रक त्याला म्हणाला, “आत्ताच एका प्रवाशांने विमान लँड केलं आहे. हे ऐकून पायलटच्या तोंडून, अरे देवा, उत्तम काम, असे उद्गार बाहेर पडले. हा ऑडिओही व्हायरल होत आहे.