Jaguar crash in Gujrat : गुजरातमध्ये बुधवारी भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान जॅग्वारचा अपघात झाल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत एका वैमानिकाचा मृत्यू झाला होता. दरम्यान या वैमानिकाबद्दल आता हृदय पिळवटून टाकणारी माहिती समोर आली आहे. या वैमानिकाचा २३ मार्च रोजी दिल्लीतील एका मुलीबरोबर साखरपुडा पार पडला होता, इतकेच नाही तर येत्या काही दिवसात या दोघांचे लग्न देखील होणार होते, याबद्दल त्यांच्या कुटुंबियांनी माहिती दिली आहे.
दोन वैमानिक असलेले हे लढाऊ विमान रात्रीच्या मोहिमेवर असताना याचा अपघात झाला होता. भारतीय हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, जामनगर येथून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच म्हणजेच बुधवारी रात्री साडे नऊच्या सुमारास हे विमान कोसळले. जामनगर शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर सुवर्दा गावाजवळ एका रिकाम्या जागेत हे विमान कोसळले आणि त्याला आग लागली. या दुर्घटनेत एक वैमानिक जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर फ्लाइट लेफ्टनंट सिद्धार्थ यादव यांचा मृत्यू झाला आहे.
हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यातील माजरा भालखी गावातील रहिवासी असलेले सिद्धार्थ हे २०१७ मध्ये भारतीय हवाई दलात सामील झाले होता. सिद्धार्थ यांचे वडील सुशील कुमार आयएएफमधून निवृत्त झाले होते तर त्याचे आजोबा रघुबीर सिंग तसेच पणजोबा देखील भारतीय सैन्यात होते. सिद्धार्थच्या यांच्या नंतर त्यांच्या कुटुंबात त्यांचे वडील, आई सुशीला देवी आणि धाकटी बहीण खुशी यांचा समावेश आहे.
रात्रीच्या मोहिमेदरम्यान वैमानिकांना विमानात तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागला आणि ते दोघे विमानातून बाहेर पडले, अशी माहिती भारतीय हवाई दलाने एका निवेदनात दिली होती. यावेळी वैमानिकांनी अएरफिल्ड आणि स्थानक नागरिकांना होणारा धोका टाळला असेही हवाई दलाने म्हटले आहे.
वडिलांची भावनिक प्रतिक्रिया
“सिद्धार्थने इतरांचे जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राण अर्पण केले, आम्हाला त्याचा अभिमान आहे,” अशी प्रतिक्रिया वडील सुशील कुमार यांनी दिली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, “तो एक हुशार विद्यार्थी होता आणि त्याने जानेवारी २०१६ साली नॅशनल डिफेन्स अकॅडमी (एनडीए) मध्ये प्रवेश घेतला. २३ मार्च रोजी त्याचा साखरपूडा झाला होता,” असेही त्याचे वडील म्हणाले. पुढे बोलताना सुशिल कुमार म्हणाले की, “मी भारतीय हवाई दलात असताना माझे आजोबा आणि वडील सैन्यात होते. सिद्धार्थ चौथी पिढी होती. तो फायटर पायलट बनला. माझे दोन्ही पुतणेही भारतीय हवाई दलात सेवा देत आहेत”.
आयएएफने त्यांच्या निवेदनात सिद्धार्थ यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून आपण कुटुंबियांबरोबर असल्याचे म्हटले आहे. तसेच या अपघाताचे कारण निश्चित करण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.