पीटीआय, नवी दिल्ली : सचिन पायलट हे गद्दार आहेत. मुख्यमंत्री म्हणून माझ्या जागी त्यांना मुख्यमंत्री केले जाऊ शकत नाही, असे वक्तव्य राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गुरुवारी केले. गेहलोत यांच्या या विधानाने राजस्थान काँग्रेसमधील तीव्र मतभेद पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आले आहेत.
पायलट यांनी २०२०मध्ये बंडखोरी केली होती, इतकेच नव्हे तर आपल्याच पक्षाचे सरकार पाडण्याचाही प्रयत्न केला होता, त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री बनवले जाऊ शकत नाही, असे गेहलोत म्हणाले. पायलट यांच्या बंडामागे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हात होता असा आरोप करून गेहलोत म्हणाले, ‘‘काँग्रेसच्या काही आमदारांना गुडगाव येथील रिसॉर्टवर एक महिन्याहून अधिक काळ डांबून ठेवण्यात आले होते आणि केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान तेथे वारंवार भेट देत होते. पायलट यांच्यासह बंडखोर आमदारांना दहा कोटी रुपये देण्यात आले होते. त्याचे पुरावेही माझ्याकडे आहेत.’’ गेहलोत यांच्या विधानावर सचिन पायलट यांनी मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. ते सध्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वढेरा यांच्यासह मध्य प्रदेशात भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत.
टोकाचे मतभेद
पायलट यांच्यावरील गेहलोत यांच्या टीकेमुळे राजस्थान काँग्रेसमध्ये खळबळ माजली आहे. राजस्थानात पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर गेहलोत यांच्या विधानाने पक्षातील टोकाचे मतभेद उघड झाले आहेत.