विदर्भातील साकोली येथील भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेडच्या (भेल) देशातील सर्वात मोठय़ा सौर ऊर्जा प्रकल्पास अंतिम मंजुरी देण्यास केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल आडकाठी करीत आहेत. हा प्रकल्प खर्चीक असून त्यात मोठय़ा प्रमाणावर वीज वापरली जाणार असल्याचे कारण गोयल यांनी पुढे केले आहे. प्रत्यक्षात सुमारे २ हजार ७३१ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या निर्मितीत १७०० कोटी रुपयांची गुंतवणूकखासगी क्षेत्रातून गोयल यांना करावयाची असल्याचा दावा सूत्रांनी केला. गोयल यांच्याविरोधात विदर्भातील खासदार नाना पटोले, रामदास तडस व अशोक नेते यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
पारंपरिक ऊर्जा हा विषय ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो. मात्र अवजड उद्योग खात्यांतर्गत येणाऱ्या ‘भेल’ने साकोलीत सौर ऊर्जा प्रकल्प स्थापण्यासाठी पुढाकार घेतल्याने पीयूष गोयल यांना रुचले नाही. या प्रकल्पाच्या विरोधामागे हेदेखील एक महत्त्वाचे कारण मानले जात आहे. पंतप्रधानांची भेट घेणाऱ्या खासदारांनी याची विस्तृत माहिती पंतप्रधानांना दिली. विदर्भात हा प्रकल्प न झाल्यास त्याचे राजकीय परिणाम भाजपला भोगावे लागतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे अवडज उद्योगमंत्री अनंत गीते यांनीदेखील या प्रकल्पासाठी पंतप्रधानांना साकडे घातले आहे. गोयल यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांना वारंवार एसएमएस व कॉल करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. हा प्रकल्प तत्कालीन संपुआ सरकारच्या काळात मंजूर करण्यात आला होता. सद्य:स्थितीत हा प्रकल्प केंद्रीय मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी पाठविला असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी दिली. एकाच मंत्र्याकडे असलेल्या कोळसा व ऊर्जा खात्यामध्ये या प्रकल्पावरून मतभेद आहेत. विशेष म्हणजे कोळसा मंत्रालयाने या प्रकल्पास हिरवा कंदील दिला असल्याचे गीते यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हा प्रकल्प होणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विदर्भातील सौर ऊर्जा प्रकल्पास पीयूष गोयलांचा विरोध
विदर्भातील साकोली येथील भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेडच्या (भेल) देशातील सर्वात मोठय़ा सौर ऊर्जा प्रकल्पास अंतिम मंजुरी देण्यास केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल आडकाठी करीत आहेत.

First published on: 15-08-2015 at 04:12 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Piyush goyal opposed solar energy project of vidarbha