कानपूरमधील अत्तर व्यावसायिक पियूष जैन यांच्या घरी टाकलेल्या धाडीमधून बेहिशोबी मालमत्ता सापडली असून अधिकारीही चक्रावले आहेत. संपूर्ण देशभरात या कारवाईची चर्चा असून तब्बल १२० तासांनी ही कारवाई संपली आहे. यावेळी २५७ कोटींची रोख रक्कम सापडली असून एकूण १६ संपत्तींची माहिती मिळाली आहे. कारवाईदरम्यान काही कागदपत्रं सापडली असून यानुसार पियूष जैन यांच्याकडे १६ महागड्या संपत्ती आहे. यामधील ४ कानपूर, ७ कनौज, २ मुंबई आणि १ दिल्लीत आहे. विशेष म्हणजे दोन संपत्ती दुबईत असल्याचं समोर आलं आहे.
रोख रक्कम आणि संपत्तीच्या कागदपत्रांसोबतच काही किलो सोनंही पियूष जैन यांच्या घरातून जप्त करण्यात आलं आहे. पियूष जैन यांना करचुकवेगिरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. महत्वाचं म्हणजे धाड टाकल्यानंतर तब्बल १२० तास कारवाई सुरु होती. ५० तासांच्या चौकशीनंतर पियूष जैन यांना अटक करत बेड्या ठोकण्यात आल्या.
आठ मशीनही २४ तासात मोजू शकल्या नाहीत पैसे; अत्तर व्यावसायिकाच्या घरी सापडली तब्बल इतकी रक्कम
गेल्या आठवड्यात प्राप्तिकर विभाग आणि जीएसटीच्या अधिकाऱ्यांनी पियूष जैन यांच्या कानपूरमधील घरावर धाड टाकत २५७ कोटींची रोख रक्कम जप्त केली होती.
पोलिसांना तपासादरम्यान पियूष जैन यांच्या कनौज येथील पूर्वजांच्या घरात १८ लॉकर्स सापडले आहेत. यावेळी त्यांना ५०० चाव्यांचा गुच्छा सापडल्या असून त्या वापरत लॉकर उघडण्याचा प्रयत्न सुरु आहे.
दरम्यान पियूष जैन यांच्या घरातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने २२ डिसेंबरला आज तकसोबत बोलताना दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा अधिकारी कारवाई करण्यासाठी आले तेव्हा पियूष जैन दिल्लीत होते. “वडिलांवरील उपचारासाठी कुटुंब दिल्लीत गेलं होतं. त्यांची दोन मुलं फक्त घरात होती,” असं त्याने सांगितलं आहे. तपास अधिकाऱ्यांनी फोन केल्यानंतर पियूष जैन घरी परतले अशी माहिती दिली. पियूष जैन यांचा मोठा भाऊ कुटुंबासोबत झारखंडला गेला होता.
पियूष जैन हे कानपुरात अत्तराचा व्यवसाय करत होते. त्यांची कनौज, कानपूर आणि मुंबईत कार्यालयात आहेत. कानपूरमधील धाडीदरम्यान प्राप्तिकर विभागाला ४० कंपन्यांचीही माहिती मिळाली आहे ज्यांच्या आधारे ते आपला व्यवसाय चालवत होते.