ब्रिटनचे गृहमंत्री तसेच इतर मंत्र्यांची ई-मेल खाती हॅक करून हेरगिरी करण्याचा कट इसिस या दहशतवादी संघटनेने आखला व त्यांची खाती हॅक करून माहिती चोरली असे प्रसारमाध्यमातील बातम्यांमध्ये म्हटले आहे.
ब्रिटनमधील गव्हर्नमेंट कम्युनिकेशन्स हेडक्वार्टर्स या संस्थेने इसिसचा हा कट उघड केला असून त्यांच्या मते पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून, वरिष्ठ मंत्री थेरेसा मे यांच्यासह अनेकांची खाती हॅक केली. द टेलिग्राफने याबाबतचे वृत्त दिले आहे. या कटातील इसिसच्या साखळीत असलेले नेते ड्रोन हल्ल्यात मारले गेले, असे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी सांगितले. वरिष्ठ मंत्र्यांच्या खासगी कार्यालयातील माहिती गोळा करून दहशतवाद्यांनी राज घराण्यातील सदस्य कोणत्या कार्यक्रमास उपस्थित आहेत याचा शोध घेतला होता. व्हाइट हॉल सुरक्षा अधिकाऱ्यांना सायबर हल्ल्यांबाबत मे मध्येच धोक्याची सूचना दिली होती व ब्रिटनवर हल्ले करण्याचा इसिसचा इरादा असल्याचे त्यावेळी स्पष्ट करण्यात आले होते. दहशतवाद्यांनी हॅकिंग करून काय माहिती मिळवली हे स्पष्ट झालेले नाही, पण सुरक्षेचा भंगही झालेला नाही असे सांगण्यात आले. अधिकाऱ्यांना पासवर्ड बदलणे व इतर सुरक्षा उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे. ब्रिटनच्या सुरक्षा दलांनी सीरियात केलेल्या हल्ल्यात ब्रिटिश जिहादी दहशतवाद्यास ठार केल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. त्याने ब्रिटनच्या राणीची हत्या करण्याचा आदेश दिला होता. ब्रिटनच्याच नागरिकाला ठार केल्याची घटना प्रथमच घडली आहे.