दिल्ली सरकारने नेल्सन मंडेला मार्गावर महात्मा गांधींचा ५० फूट उंच पूर्णाकृती पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दिल्लीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) ही महत्त्वकांक्षी योजना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक अडथळ्यांमुळे हा प्रकल्प पुढे सरकत नव्हता. अखेर हा प्रकल्प रद्द करण्यात आल्याचं पीडब्ल्यूडीमधील अधिकाऱ्यांनी सांगितलं. पुतळ्याच्या उंचीमुळे हा प्रकल्प रखडला होता, आता हा प्रकल्प पुतळ्याची उंची आणि वजनाच्या कारणास्तव रद्द झाला आहे. १० फूट उंचीचा पाया रचून त्यावर ५० फूट उंचीचा पूतळा बसवला जाणार होता. परंतु, या पुतळ्याचं वजन ५०० किलो आहे. अधिकाऱ्यांच्या मते पुतळ्याच्या उंचीच्या तुलनेत त्याचं वजन कमी आहे. त्यामुळे हा पुतळा स्थिर राहील की नाही याबाबत शंका होती. परिणामी हा पुतळा उभारण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे.

सोसाट्याचा वारा वाहू लागल्यावर हा पुतळा ढासळू शकतो, असं झाल्यास ती देशासाठी लाजिरवाणी बाब ठरली असती. अशी कोणत्याही प्रकारची आपत्ती टाळण्यासाठी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटदारांना इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी दिल्लीशी चर्चा करण्याचे निर्देश दिले होते. आयआयटी दिल्लीने योग्य उपाय सुचवल्यास आपल्याला हा प्रकल्प पुढे नेता येईल असंही अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं. मात्र यावर ठोस तोडगा निघाला नसल्यामुळे पीडब्ल्यूडीने हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

पीडब्ल्यूडीमधील अधिकाऱ्यांनी सांगितलं की हातात काठी धरलेला महात्मा गांधींचा पुतळा तयार करण्याचं कामही चालू होतं. हा पुतळा दुरूनही दिसावा असा उद्देश असल्यामुळे पुतळ्याची उंची ५० फूट इतकी ठेवण्यात आली होती. पुतळ्याच्या आसपासच्या भागाचं सुशोभिकरणाचं काम पूर्ण झालं होतं. पदपथाचं नुतनीकरण पूर्ण झालं आहे. तसेच या रस्त्यालगत सायकल ट्रॅकही तयार करण्यात आला आहे. यासह वृक्षारोपण करण्यात आलं आहे.

हे ही वाचा >> ना जाहिरातबाजी, ना सोहळा… ‘या’ देशाचे पंतप्रधान राजीनामा देऊन सायकलवर बसून घरी गेले, VIDEO व्हायरल

सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितलं की आम्ही सुशोभिकरणाचं काम पूर्ण केलं आहे. शोभेचे खाब, सजावटीचे दिवे बसवून त्यांची विजेची जोडणी देखील पूर्ण झाली आहे. वसंत कुंज मॉल परिसरात पाम वृक्ष आणि इतर शोभीवंत झाडं लावली आहेत. तसेच एक छोटंसं उद्यानही उभारलं आहे. नेल्सन मंडेला मार्ग मुनिर्कातील अनेक भागांना जोडतो. तसेच हा मार्ग वसंत कुंज आणि दक्षिण दिल्लीतील अनेक भागांशी जोडलेला आहे. पुतळ्यासह या भागाचा पुनर्विकास करण्यासाठी १९.१६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

Story img Loader