अल् काईदाचा अमेरिकी कारवाईत मारला गेलेला म्होरक्या ओसामा बिन लादेन याचे कुटुंबीय एका खासगी जेट विमान उतरताना कोसळून दक्षिण इंग्लंडमध्ये मरण पावले, अशी माहिती सौदी अरेबियाच्या दूतावासाने दिली आहे. फेनॉम ३०० जेट विमान इटलीहून आले होते व ते हॅम्पशायर येथील ब्लॅकबुश विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात असताना कोसळले. त्यात वैमानिकासह चार जण काल ठार झाले. सौदी अरेबियाचे राजदूत युवराज महमद बिन नवाझ अल सौद यांनी ट्विटरवर बिन लादेनच्या कुटुंबीयांना श्रद्धांजली वाहिली आहे. लादेनचे कुटुंब हे सौदी अरेबियातील उद्योग व्यवसायात नावाजलेले होते, पण नेमके कोण मृत्युमुखी पडले हे समजले नाही. युवराज महंमद बिन नवाझ बिन अब्दुल अझीज हे इंग्लंडमधील दोन मशिदींचे मालक आहेत तेथे त्यांनी लादेनच्या कुटुंबीयांना श्रद्धांजली वाहिली.
सौदी अरेबियातील सामाजिक माध्यमांच्या व संकेतस्थळांच्या मते मृतांमध्ये लादेनची बहीण व सावत्र आई यांचा समावेश होता. लादेन हा २०११ मध्ये अमेरिकी नेव्ही सील्सच्या कारवाईत पाकिस्तानात मारला गेला होता. या तपशिलाची शहानिशा झाली नसली तरी ते विमान लादेन कुटुंबाच्या मालकीचे होते असे द गार्डियनने म्हटले आहे. ओसामाचे वडील महंमद बिन लादेन हे १९६७ मध्ये सौदी अरेबियातील विमान अपघातात मरण पावले होते. या घटनेची चौकशी करण्यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या मदतीने प्रयत्न केले जातील तसेच मृतदेह ताब्यात घेतले जातील.
प्रत्यक्ष घटना पाहणाऱ्यांनी सांगितले की, या जेट विमानाचा हवेतच स्फोट झाला व ते ब्रिटिश मोटारींचे लिलाव जिथे होतात त्या केंद्राजवळ कोसळले, ब्लॅकबुश विमानतळ अधिकाऱ्यांच्या मते ते उतरत असताना धावपट्टीवर कोसळले. हे विमान साठ सेकंद जळताना आपण पाहिले असे तेथील एका गोदामातील कर्मचारी बॅरी राईट यांनी सांगितले.

Story img Loader