Plane Crash : कझाकिस्तानच्या अक्ताऊ या ठिकाणी विमान क्रॅश होऊन मोठा अपघात झाला आहे. समुद्र किनाऱ्याच्या जवळ हे विमान क्रॅश झालं. स्फोटाचा व्हिडीओही समोर आला आहे. या विमानात १०० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. विमानात तांत्रिक बिघाड जाल्यानंतर वैमानिकाने इमर्जन्सी लँडिंगसाठी सूचना केली होती. मात्र पुढे हे विमान क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे. अजरबाईजन एअरलाईनचं हे विमान होतं. या विमानात १०० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात ४२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होते आहे. पीटीआयने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
नेमकं एअरलाईन्से काय म्हटलं आहे?
अजरबाईजन एअर लाईन्सचं हे म्हणणं आहे की ज्या विमानाचा अपघात झाला त्याचा क्रमांक J2-8243 असा होता. बाकू पासून ग्रॉन्जी हवाई मार्गावर तातडीने या विमानाचं लँडिंग करावं लागलं. अक्ताऊपासून तीन किमी अंतरावर लँडिंग करत असतानाच विमान दुर्घटनाग्रस्त झालं. TASS या रशियन न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीसुरा हे विमान मखाचाकलाच्या दिशेने वळवण्यात आलं होतं. विमानाचा अपघात झाल्यानंतर सदर ठिकाणी ५२ फायरफायटर्स आणि ११ बचावपथकं तैनात करण्यात आली आहेत ज्यांच्याकडून मदत आणि बचावकार्य सुरु आहे. या अपघातात ४२ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होते आहे.
रशियन वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार अजरबैजान एयरलाईन्सच्या या विमानाने रशियाच्या चेचन्या येथील बाकूमधून ग्रोज्नीसाठी उड्डाण केलं होतं. ग्रोज्नीमध्ये धुके पडल्याने या विमानाने प्रवासी मार्ग बदलला होता. विमान धावपट्टीच्या अगदी जवळ होते. त्याचवेळी कोणीतरी त्याचा व्हिडिओ शूट करत होते. हे विमान उतरत असताना अचानक थेट जमिनीकडे येताना या व्हिडिओत दिसतं आहे. हे विमान इतकं तिरकं झालं की ते जमिनीवर आदळेल असंच वाटतं. तसंच घडलंही. धावपट्टीवर येण्यापूर्वीच हे विमान जमिनीवर आदळलं त्यावेळी मोठा आवाज झाला. मोठ्या आवाजाने विमानातील प्रवासी किंचाळत असल्याचा आवाजही व्हायरल व्हिडीओत येतो. विमान कोसळल्यावर त्याला आग लागल्याचे या दृश्यात दिसते. एक्स या मायक्रोब्लॉगिंग साईटवर या अपघाताचे व्हिडीओ लोक पोस्ट करत आहेत.
जखमींना रुग्णालयात करण्यात आलं दाखल
सदर घटनेचं वृत्तांकन करणाऱ्या काही वृत्तसंस्थांनी विमानाचा अपघात हा दाट धुक्यांमुळे झाला आहे आणि इमर्जन्सी लँडिंग करताना विमान कोसळलं आणि अपघात झाला असं म्हटलं आहे तर काही वृत्तसंस्थांनी विमानाच्या मार्गात पक्षी आल्याने हा अपघात घडला असं म्हटलं आहे. मात्र नेमकं काय घडलं ते कारण अद्याप समोर यायचं आहे. या अपघातात जे लोक जखमी झाले आहेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.