South Sudan Plane Crash 20 Dead Including One Indian : दक्षिण सुदानमध्ये एका विमानाला अपघात झाला आहे. या विमानात प्रवासी आणि क्रू मेंबर्ससह २१ लोक होते. या अपघातात २० जणांचा मृत्यू झाला असून, या मृतांमध्ये दोन चीनी आणि एका भारतीय नागरिकाचा समावेश आहे. अपघात झाला तेव्हा विमान युनिटी ऑइलफील्ड विमानतळावरून राजधानी जुबाकडे उड्डाण करत होते. युनिटी राज्याचे माहिती मंत्री गटवेच बिपल यांनी अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या विमानात ग्रेटर पायोनियर ऑपरेटिंग कंपनीशी संबंधित तेल क्षेत्रातील कर्मचारी होते. ही कंपनी चायना नॅशनल पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि नाईल पेट्रोलियम कॉर्पोरेशन यांच्या सहकार्याने काम करते. मृतांमध्ये दोन चिनी नागरिक आणि एका भारतीय नागरिकांचा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२१ पैकी फक्त एक प्रवासी बचावला

सुरुवातीला या अपघातात १८ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त होते परंतु नंतर आणखी दोन जखमी प्रवाशांचाही मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या २० झाली. मात्र, या अपघातातून एक जण बचावला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या छायाचित्रांमध्ये एक शेतात विमानाचे अवशेष पडलेले दिसत होते. हे विमान ग्रेटर पायोनियर ऑपरेटिंग कंपनी (GPOC) ने चार्टर्ड केले होते आणि ते लाईट एअर सर्व्हिसेस एव्हिएशन कंपनी द्वारे चालवले जात होते. दरम्यान या अपघाताचे कारण अद्याप कळलेले नाही. या अपघाताबाबत तेल समृद्ध असलेल्या युनिटी राज्याचे माहिती मंत्री गटवेच बिपाल यांनी माहिती दिली आहे.

स्वातंत्र्य मिळाल्यापासून सतत विमान अपघात

२०११ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून, दक्षिण सुदानला खराब वाहतूक पायाभूत सुविधांचा सामना करावा लागत आहे आणि विमान अपघात बहुतेकदा ओव्हरलोडिंग किंवा खराब हवामानामुळे होतात. गेल्या काही वर्षांत दक्षिण सुदानमध्ये अनेक विमान अपघात झाले आहेत. २०१८ मध्ये, जुबाहून यिरोलला जाणारे विमान कोसळले होते, ज्यामध्ये १९ जणांचा मृत्यू झाला होता. २०१५ मध्येही, जुबा विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच एक रशियन मालवाहू विमान कोसळले होते, ज्यामध्ये सुमारे १२ लोकांचा मृत्यू झाला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Plane crash south sudan kills 20 including one indian air accident aviation disaster victims