US Plane Crash Philadelphia : अमेरिकेतील फिलाडेल्फिया शहरात शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास एका छोट्या विमानाला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. फिलाडेल्फिया शहरातील एका शॉपिंग मॉलजवळ हे विमान असचानक क्रॅश झालं. हे विमान कोसळल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या काही वाहनांना आणि घरांना आग लागली. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. हे विमान सहा जणांना घेऊन जात होतं अशी माहिती आता समोर आली आहे. या घटनेत जीवितहानी झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
वृत्तानुसार, अमेरिकेच्या फिलाडेल्फिया येथे एक छोटं विमान कोसळलं. या विमानातून सहा जण फिलाडेल्फियावरून मिसूरीला जात होते. यामध्ये दोन डॉक्टर, दोन पायलट, आणि आणखी दोन जणांचा समावेश होता. मात्र, या विमानाने टेकऑफनंतर केल्यानंतर अवध्या ३० सेकंदातच कोसळलं. हे विमान १६०० फूट उंचीवर गेल्यानंतर रडारवरून गायब झालं. त्यानंतर काही क्षणात हे विमान कोसळलं आणि विमानाला भीषण आग लागली, तसेच विमान ज्या ठिकाणी कोसळलं त्या ठिकाणी असणाऱ्या काही गाड्या आणि घरांनाही आग लागली. या संदर्भातील वृत्त रॉयटर्सच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
Another plane crash just now in Philadelphia; we can't rush to judgment until we know if the pilot is black or white.pic.twitter.com/7zSG1n0rn1
— Alex Cole (@acnewsitics) January 31, 2025
वृत्तानुसार, हे विमान कोसळ्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या आगीच्या ज्वाळा दिसून आल्या. या संदर्भातील एक व्हिडीओही समोर आला आहे. हा अपघात झाल्यानंतर तात्काळ अमेरिकेच्या स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, पोलीस, अग्निशमन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरु आहे. तसेच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या देखील दाखल झाल्या आहेत. सध्या मदतकार्य सुरु असून या अपघातात नेमकी किती जणांचा मृत्यू झाला? याची अद्याप पुष्टी झालेली नाही. या घटनेबाबत पेनसिल्व्हेनियाचे गव्हर्नर जोश शापिरो यांनी घटनेचा आढावा घेतला असून योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
दोन दिवसांपूर्वीच विमान आणि हेलिकॉप्टरचा झाला होता अपघात
अमेरिकेत ६४ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान अमेरिकन लष्कराच्या ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरला धडकल्याने भीषण अपघात झाला होता. वॉशिंग्टन डीसीतील रेगन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीजवळ हा अपघात घडला. अपघातानंतर हे विमान आणि हेलिकॉप्टर पोटोमॅक नदीच्या परिसरात कोसळले होते. अमेरिकन एअरलाइन्सच्या अपघातग्रस्त फ्लाइट ५३४२ मध्ये ६० प्रवासी आणि ४ क्रू मेंबर्स होते. या विमानाने कॅन्ससच्या विचिटा येथून उड्डाण केले होते.