मानवी तस्करीच्या (Human Trafficking) आरोपाखाली फ्रान्समध्ये थांबवण्यात आलेलं विमान प्रवाशांसह मुंबईत दाखल झालं आहे. या विमानात ३०३ प्रवासी होते. ज्यापैकी २७६ प्रवासी मुंबईत परतले आहेत. इतर प्रवाशांपैकी काहींनी फ्रान्समध्ये आश्रय मागितला. तर दोन प्रवाशांवर आरोप दाखल करण्यात आले आहेत. भारत सरकारने या प्रकरणी फ्रान्स सरकारचे आभार मानले आहेत.
सोमवारी नेमकं काय घडलं?
मानवी तस्करीच्या आरोपांमुळे फ्रान्समध्ये थांबवलेल्या विमानाने २५ डिसेंबरला म्हणजेच सोमवारी उड्डाण केलं. २२ डिसेंबरला मुंबईला जाणारं हे विमान व्हॅट्री या पॅरीस जवळच्या विमानतळावर थांबवण्यात आलं होतं. या विमानात ३०३ प्रवासी होते. ज्यातले बहुतांश प्रवासी हे भारतीय होते. आता २७६ प्रवाशांसह हे विमान मुंबईत दाखल झालं आहे. यानंतर केंद्र सरकारने फ्रान्स सरकारचे आभार मानले आहेत.
मानवी तस्करीच्या आरोपावरून फ्रान्समध्ये थांबवण्यात आलेलं हे विमान आता भारतीय प्रवाशांसह प्रवाशांना घेऊन विमान मुंबईत पोहोचलं आहे. या विमानाने २७६ प्रवासी भारतात पोहोचले आहेत. विमानाने फ्रान्समधील व्हॅट्री विमानतळावरून २५ डिसेंबरला दुपारी अडीच वाजता उड्डाण केलं आणि मंगळवारी पहाटे चार वाजता हे विमान मुंबईत उतरलं.
फ्रेंच अधिकाऱ्यांनी रविवारी, २४ डिसेंबरला रोमानियन कंपनी ‘लेजेंड एअरलाइन्स’ द्वारे संचालित A340 विमानाचा प्रवास पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली. दुबई, संयुक्त अरब अमिरात येथून ३०३ प्रवाशांसह निकाराग्वाला जाणारं विमान शुक्रवारी, २२ डिसेंबरला पॅरिसपासून १५० किमी पूर्वेकडील व्हॅट्री या विमानतळावर मानवी तस्करीच्या संशयावरून थांबवण्यात आलं होतं.