पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी लाल किल्ल्यावरून देशवासीयांना उद्देशून केलेल्या भाषणात नियोजन आयोगाला पर्याय म्हणून नव्या संस्थेची निर्मिती करण्याची महत्वपूर्ण घोषणा केली. आगामी काळात देशातंर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर बदलत असलेली आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन या संस्थेची निर्मिती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. येणाऱ्या काळात भारतीय बनावटीच्या उत्पादनांचा लौकिक जगभर पसरला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. उत्पादनांची निर्मिती करताना आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘झीरो डिफेक्ट, हंड्रेड इफेक्ट’ अशी प्रतिमा तयार करण्याच्या दृष्टीने वाटचाल करण्याचा सल्ला मोदींनी दिला. मी देशाचा पंतप्रधान म्हणून नाही तर, ‘प्रधानसेवक’ या नात्याने देशवासीयांशी बोलत असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. यासोबतच सराकारविषयी बोलताना मोदी म्हणाले, आम्ही बहुमताच्या नव्हे तर सहमतीच्या आधारावर सरकार चालवतो.
नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे:
* मी तुमच्यासमोर ‘पंतप्रधान‘ म्हणून नाही, तर ‘प्रधान सेवक’ म्हणून उभा आहे.
* देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्या पिढ्यांनी तरुण वयामध्येच जीवन समर्पित केले. स्वातंत्र्यलढ्यामध्ये बलिदान दिलेल्या सर्वांना मी सलाम करतो.
* नेते किंवा सत्ताधारी, सरकार राष्ट्र तयार करत नाहीत. शेतकरी, कामगार, महिला, तरुण, शास्त्रज्ञ यांच्यामुळे राष्ट्र घडते.
* आतापर्यंत देशाच्या प्रगतीसाठी सर्व पंतप्रधानांनी, सर्व राज्यांमधील सरकारचे योगदान आहे.
निवडणुकीतील जनादेशाच्या जोरावर पुढे जाण्याची आमची इच्छा नाही. एकत्र काम करत सामंजस्याने काम करण्याकडे आमचा कल आहे.
* बलात्काराच्या घटनांबद्दल वाचले, की मान शरमेने खाली जाते. मुलींवर निर्बंध लादण्याचे प्रयत्न केले जातात; पण स्वत:च्या मुलांना जाब विचारण्याचे धाडस कुणी करते का? शेवटी, बलात्कार करणारा हा कुणाचातरी मुलगा असतोच. पालक म्हणून मुलगा आणि मुलगी या दोघांनाही सारखीच फुटपट्टी लावली पाहिजे.
* आपल्या देशातील महिला-पुरुषांचे प्रमाण पाहिले आहे? समाजात हा असमतोल कोण निर्माण करत आहे? स्त्री-भ्रूण हत्या करू नये, असे माझे सर्व डॉक्टरांना आवाहन आहे.