पत्रकार आणि विचारवंत गौरी लंकेश यांच्या हत्येचा कट पाच वर्षांपासून रचला जात होता अशी माहिती SIT अर्थात विशेष तपास पथकाने बेंगळुरु येथील कोर्टात सादर केलेल्या आरोपपत्रात दिली आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी दिवाणी आणि सत्र न्यायालयात ९ हजार २३५ पानांचे आरोपपत्र दाखल केले. सनातन संस्थेशी संबंधित असलेल्या नेटवर्कने गौरी लंकेश यांची हत्या केली. तसेच त्यांच्या हत्येचा कट पाच वर्षांपासून रचला जात होता, असेही या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

गौरी लंकेश आणि त्यांची हत्या करणारा हल्लेखोर यांच्यात कोणतीही दुश्मनी नव्हती. गौरी लंकेश यांना फक्त यासाठी ठार करण्यात आले कारण त्या एका विशिष्ट विचारधारेचा आदर करत होत्या. तसेच सत्ताधाऱ्यांच्या आणि कट्टर धर्मीयांच्या विरोधात त्यांनी कायमच प्रखरपणे लिखाण केले. मात्र ५ सप्टेंबर २०१७ ला त्यांची हत्या करण्यात आली.

काय आहे प्रकरण?
सुप्रसिद्ध पत्रकार आणि बेंगळुरु येथील लंकेश पत्रिका या साप्ताहिकाच्या संपादक गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ ला हत्या करण्यात आली. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी यांच्याप्रमाणेच गौरी लंकेश यांनाही ठार करण्यात आलं. चार हल्लेखोरांनी घरात घुसून गौरी लंकेश यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर फरार झाले. या हत्येचा अनेक विचारवंतांनी निषेध केला होता. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची सत्ता आल्यानंतर देशात विचारवंतांच्या हत्या वाढल्याची टीका काँग्रेसने केली होती.

या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास करत गौरी लंकेश यांच्या हल्लेखोरांना अटक केली. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयातही गेले आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येचा कट पाच वर्षांपासून शिजत होता असे आता एसआयटी अर्थात विशेष तपास पथकाने स्पष्ट केले आहे.