हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित असलेले महानाटय़ ‘जाणता राजा’ एका तपानंतर म्हापसा येथे पुढील आठवडय़ात आयोजित करण्यात आले आहे.
  २६२५ चौरस फूट क्षेत्रातील पाचमजली मंचावर २०० कलाकार हे महानाटय़ साकारतील. भारत व अमेरिकेतही या महानाटय़ाचे ९८५ प्रयोग झाले आहेत.
   स्थानिक आयोजक राजन घाटे यांनी सांगितले, की गोव्याच्या लोकांचीच हे महानाटय़ येथे पुन्हा व्हावे अशी इच्छा होती, त्यामुळे २००१ नंतर प्रथमच हे महानाटय़ येथे पुढील आठवडय़ात आयोजित करण्यात आले आहे. पुणे येथील महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान यांनी या महानाटय़ाची निर्मिती केली असून, लेखन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आहे.  
   शिवाजीमहाराजांच्या काळातील देखावे हत्ती, घोडे, उंट, बैलगाडी व पालख्या यांच्यासह हुबेहूब यात सादर केले जाणार आहेत. म्हापसा येथे १५ एप्रिलपासून या महानाटय़ाचे प्रयोग होणार असून स्थानिक श्री प्रतिष्ठा सोसायटी त्यासाठी स्थानिक पातळीवर मदत करीत आहेत. श्री प्रतिष्ठा सोसायटीचे अध्यक्ष दीपक गाडेकर यांनी सांगितले, की पुण्यातील शनिवारवाडय़ाची व आग्रा किल्ल्याची पाचमजली प्रतिकृती या वेळी उभारण्यात येणार आहे.