आपल्याला जामीन मंजूर झाल्याचे कळल्यावर स्पॉट फिक्सिगमधील आरोपी एस. श्रीशांतची पहिली प्रतिक्रिया होती ‘थॅक गॉड!’ त्याला त्याचा मित्र जयन थेक्केदाथ याच्याकडून जामीन मिळाल्याबद्दल माहिती मिळाली. जामीन मिळाल्याचे कळल्यावर बाहेर येण्यासाठी उतावीळ झालेला श्रीशांत जयनला म्हणाला, प्लीज, लवकर इथे येऊन मला इथून बाहेर काढ.
राजस्थान रॉयल्सकडून खेळणारया श्रीशांतला १६ मे रोजी स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी मुंबईतून अटक केली होती. अटक केल्यापासून श्रीशांतचे वकील त्याला जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र, सुरुवातीला पोलिस कोठडी आणि त्यानंतर मोक्का लावण्यात आल्यामुळे श्रीशांतचा जामीन दिल्लीतील न्यायालयाने सातत्याने फेटाळला. पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याची रवानगी तिहार कारागृहात झाली होती. तिहारमध्ये गेल्यापासून श्रीशांत खूपच अस्वस्थ होता. कारागृहातून कधी एकदा बाहेर पडतोय, अशीच त्याची अवस्था झाली होती.
सोमवारी जामीन अर्जावर सुनावणी असल्याचे कळल्यावर श्रीशांत कारागृहातील दूरध्वनीवरून जयनच्या संपर्कात होता. सोमवारी संध्याकाळी त्याने जामीन मिळाला का, हे विचारण्यासाठी जयनला फोन केला. मात्र, अजून सुनावणी सुरूच असल्याचे जयनने त्याला सांगितले. त्यावर मी तुला अर्धा तासाने पुन्हा फोन करतो, अशी प्रतिक्रिया श्रीशांतने व्यक्त केली. त्यानंतर पुन्हा अर्धा तासाने श्रीशांतने जयनला फोन केला. त्यावेळी जयननेच त्याला जामीन मंजूर झाल्याचे सांगितले.
श्रीशांत, अंकित चव्हाण यांच्यासह एकूण १८ जणांना सोमवारी संध्याकाळी जामीन मंजूर झालाय.

Story img Loader