नासाच्या हबल अवकाश दुर्बिणीने शोधलेल्या मेकमेक या बटू ग्रहाला एक चंद्रही आहे, हा चंद्र छोटा असून चमकदार नाही तर काळा आहे. तो मेकमेक या बटूग्रहाभोवती फिरत आहे. सौरमालेतील कुईपर पट्टय़ात मेकमेक हा चमकदार बर्फाळ ग्रह असून असा आणखी एक ग्रहही आहे. या ग्रहाच्या चंद्राचे नाव तूर्त एस/२०१५ (१३६४७२) ठेवले असले तरी एमके २ असे त्याचे टोपण नाव आहे. तो मेकमेक या ग्रहापेक्षा १३०० पट कमी प्रकाशमान आहे. त्यामुळे तो काळाच दिसतो. एमके २ हा बटू ग्रहापासून २०९२१ कि.मी. अंतरावर असून त्याचा व्यास १६० कि.मी. आहे. मेकमेकचा व्यास १४०० कि.मी. आहे. मेकमेक ग्रहाचा शोध २००५ मध्ये लागला असून त्याला इस्टर आयलंडवरील रापा नुई देवतेची निर्मिती म्हणून मेकमेक असे नाव दिले आहे. कुईपर पट्टा हा सौरमालेतील एक मोठा भाग असून तो ४.५ अब्ज वर्षांपूर्वी सौरमालेची निर्मिती झाल्यानंतर उरलेल्या अवशेषांचा बनलेला आहे. अनेक बटू ग्रह तेथे आहेत. यातील काही ग्रहांचे उपग्रह माहिती आहेत पण मेकमेकचा उपग्रह म्हणजे चंद्र आता सापडला आहे. इंटरनॅशनल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल युनियनने यातील पाच बटू ग्रहांना मान्यता दिली आहे. या ग्रहात प्रथमच चंद्र सापडण्याची घटना घडली आहे. हबल दुर्बिणीने वाइड फील्ड कॅमेरा तीनच्या मदतीने एप्रिल २०१५ मध्ये हा चंद्र शोधला असून निरीक्षण पथकाने हबल दुर्बिणीच्या मदतीने २००५, २०११, २०१२ मध्ये लहान उपग्रह शोधले होते. त्याच पद्धतीने मेकमेक ग्रह व त्याचा चंद्र शोधण्यात आला आहे. यापूर्वी मेकमेकचा चंद्र सापडला नव्हता. आमच्या अंदाजानुसार मेकमेकच्या चंद्राची (एखाद्या ग्रहाचा नैसर्गिक उपग्रह) कक्षा ग्रहापासून जवळ आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही या चंद्राकडे बघता तेव्हा तो मेकमेकच्या प्रकाशात अंधारा गोल दिसतो, असे साउथवेस्ट रीसर्च इन्स्टिटय़ूट या अमेरिकी संस्थेतील अ‍ॅलेक्स पार्कर यांनी म्हटले आहे. या चंद्राचा शोध ही बटूग्रह प्रणालींच्या संशोधनात महत्त्वातील बाब असून त्याची कक्षा मोजून त्याचे वस्तुमान सांगता येईल. बटू ग्रहांना चंद्र असू शकतात हे यातून सिद्ध झाले आहे. मेकमेक हा प्लुटोसारखा दुर्मीळ ग्रह असून त्याचा साथीदार चंद्र शोधणे महत्त्वाचे होते, असे पार्कर यांनी सांगितले. या चंद्राच्या शोधाने मेकमेकची अधिक माहिती मिळणार असून प्लुटो व मेकमेक यांच्यासारखे आणखी ग्रह शोधले जाऊ शकतात. प्लुटो व मेकमेक हे गोठलेल्या मिथेनचे ग्रह आहेत. प्लुटोप्रमाणेच मेकमेकच्या उपग्रहाच्या अभ्यासातून मूळ ग्रह म्हणजे मेकमेकची घनता कळणार आहे. मेकमेक व प्लुटो यात काही साम्य आहे की नाही हे यातून स्पष्ट होईल. संशोधकांच्या मते हबल दुर्बिणीच्या मदतीने या चंद्राच्या कक्षेची निरीक्षणे करून ती अंडाकार की वर्तुळाकार हे ठरवावे लागणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार जर हा चंद्र वर्तुळाकार कक्षेत मेकमेक भोवती फिरत असेल, तर तो मेकमेक ग्रहाभोवती १२ दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवसांत प्रदक्षिण पूर्ण करीत असावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा