पॅरिसमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी निषेध केला असून या कठीण प्रसंगात भारत फ्रान्सच्या जनतेसोबत आहे, असे नमूद केले आहे.
राष्ट्रपती मुखर्जी यांनी सांगितले, की आम्ही फ्रान्सच्या पाठीशी आहोत, तेथील लोकांच्या वेदनेत आम्ही सहभागी आहोत. पंतप्रधान मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे, की पॅरिसमधील हल्ल्याची बातमी संतापजनक व भयानक आहे. आम्ही या शोकात्म घडीला फ्रान्सच्या लोकांसमवेत आहोत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले, की आम्ही फ्रान्सच्या जनतेच्या दु:खात सहभागी आहोत व त्यांच्या पाठीशीही आहोत. पॅरिसमधील हल्ला भयानक असून त्याचा धिक्कार करण्यास शब्द अपुरे आहेत. अनेक निरपराध लोक यात बळी पडले आहेत. दहशतवाद हा दहशतवादच असतो, त्याची दुसऱ्या कशाशी तुलना करता येणार नाही. या हल्ल्याची तुलना २६/११ हल्ल्यांशी करता येईल का असे विचारले असता त्यांनी सांगितले, की याची दुसऱ्या हल्ल्याशी तुलना करणे उचित नाही. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे, की दहशतवादाने स्वातंत्र्य व उदारतेचा पराभव करता येणार नाही. पॅरिस हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. दहशतवादामुळे स्वातंत्र्य व उदारता दडपून टाकता येणार नाही.

Story img Loader