संरक्षण आणि आरोग्य यासह अनेक क्षेत्रांमध्ये भारत हा आयात केलेल्या उत्पादनांवर अवलंबून आहे. त्यामुळे या क्षेत्रातील आधुनिक उत्पादने विकसित करण्याचे आव्हान आयआयटीसारख्या संस्थांनी स्वीकारावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले.
भारतीय रेल्वेला उपयुक्त ठरतील अशा नव्या सुलभ कल्पना मांडण्यात सहभाग देण्याबरोबरच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पर्यावरण पोषक, स्वस्त आणि उत्तम बांधकाम असलेली घरे बांधून ‘सर्वासाठी घर’ ही संकल्पना साकारण्यासाठी कार्य करावे, असे आवाहनही या वेळी मोदी यांनी केले.
देशातील सर्व आयआयटीच्या संचालकांच्या परिषदेला संबोधित करताना मोदी यांनी विविध आयआयटीमधील तरुण हुशार विद्यार्थ्यांच्या मनात देशसेवेचे व्रत रुजविण्याचे आवाहनही केले.
संरक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील उपकरणे त्याचप्रमाणे चलनी नोटांसाठी लागणारी शाई आणि अश्रुधूर अशा संवेदनक्षम आणि सुरक्षेशी निगडित घटकांची आयात करावी लागते, अशी उदाहरणे मोदी यांनी दिली. सदर घटक बनविण्याची क्षमता भारतात नाही हेच मुळात आपल्याला अमान्य आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

Story img Loader