पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सोमवारी कर्नाटक सरकारवर जोरदार टीकेची तोफ डागून हे सरकार भ्रष्टाचार आणि कुशासनाने बरबटलेले आहे, अशी झोड उठविली. राज्यातील अल्पसंख्याकांना सुरक्षित वाटत नसल्याचाही आरोप पंतप्रधानांनी केला. कर्नाटकात येत्या पाच मे रोजी राज्य विधानसभेच्या निवडणुका होत असून काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या प्रचारसभांमध्ये पंतप्रधान बोलत होते. राज्यात चांगल्या कारभाराअभावी तसेच प्रभावी नेतृत्वाच्या अभावामुळे हे राज्य इतरांच्या तुलनेत गेली पाच वर्षे मागे पडले आहे. सात वर्षांपूर्वी राज्यात काँग्रेस सत्तारूढ होती तेव्हा कर्नाटक हे राज्य विकासाचे मॉडेल म्हणून ओळखले जात होते. परंतु नंतरच्या पाच वर्षांमध्ये भाजपच्या राजवटीत ही परिस्थिती पूर्णपणे बदलून अत्यंत वाईट झाली. आज कर्नाटक हे कुशासन, भ्रष्टाचार आणि विकास नसलेले राज्य म्हणून ओळखले जात आहे, या शब्दांत पंतप्रधानांनी झोड उठविली. राज्याच्या काही भागांमध्ये पाणी आणि वीजटंचाई असून कायदा आणि सुव्यवस्था स्थितीही फारशी चांगली नसल्याची टीका त्यांनी केली.
गेल्या पाच वर्षांत भाजपने तीन मुख्यमंत्री बदलले आणि भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे अनेक मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला असून अनेक उच्चपदस्थांनाही भ्रष्टाचाराच्याच आरोपाखाली चौकशीला तोंड द्यावे लागत आहे याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. विकासकामांमध्ये अल्पसंख्याकांना डावलले जात असल्याचा आरोपही पंतप्रधानांनी केला. राज्यातील अल्पसंख्याकांमध्ये असुरक्षिततेची भावना असल्यामुळे राज्यातील सामाजिक सलोखा धोक्यात आला असल्याचा इशारा मनमोहन सिंग यांनी दिला. भाजपने निर्माण केलेली परिस्थिती बदलण्याची आवश्यकता असून काँग्रेस सत्तेवर आल्यास तुम्हाला स्वच्छ आणि भ्रष्टाचारमुक्त राजवट मिळेल, असे आश्वासन मनमोहन सिंग यांनी दिले.
कर्नाटकातील अल्पसंख्याकांमध्ये असुरक्षिततेची भावना
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सोमवारी कर्नाटक सरकारवर जोरदार टीकेची तोफ डागून हे सरकार भ्रष्टाचार आणि कुशासनाने बरबटलेले आहे, अशी झोड उठविली. राज्यातील अल्पसंख्याकांना सुरक्षित वाटत नसल्याचाही आरोप पंतप्रधानांनी केला. कर्नाटकात येत्या पाच मे रोजी राज्य विधानसभेच्या निवडणुका होत असून काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या प्रचारसभांमध्ये पंतप्रधान बोलत होते.
First published on: 30-04-2013 at 02:05 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm attacks bjp says minorities feel insecure in karnataka