पंतप्रधान नरेंद्र मोदी पळू शकतात. लपून राहू शकतात पण अखेर सत्य काय ते समोर येईलच. सीबीआय संचालकांना हटवण्याच्या निर्णयाचा काहीही फायदा होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घाबरुन सीबीआय संचालक आलोक वर्मा यांना हटवले असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. ते लोधी कॉलनी पोलीस स्टेशन बाहेर पत्रकारांशी बोलत होते.
राफेल घोटाळयात चौकशी होऊ नये यासाठी पंतप्रधान मोदींनी आलोक वर्मांना दूर केल्याचा राहुल गांधींचा आरोप आहे. नरेंद्र मोदी यांनी सीबीआय असो वा निवडणूक आयोग देशातील प्रत्येक संस्थेचे नुकसान केले आहे. ते देशातील प्रत्येक संस्थेवर हल्ला करत आहेत. देशाचा चौकीदार चोर असल्यामुळेच हे हल्ले होत आहेत. त्यांनी अनिल अंबानींच्या खिशात ३० हजार कोटी रुपये ठेवले आहेत या आपल्या जुन्या आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला.
PM can run, he can hide but in the end, truth will be revealed. Removing #CBI Director will not help. PM acted against CBI Director; it was an act out of panic: Congress President Rahul Gandhi after leaving Lodhi Colony police station in Delhi pic.twitter.com/w5QJfREUMm
— ANI (@ANI) October 26, 2018
दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सीबीआय कार्यालयावर मोर्चा निघाला होता. विरोधी पक्षाचे प्रमुख नेतेही या मोर्चात सहभागी झाले होते. काँग्रेसचा हा मोर्चा सीबीआय मुख्यालयाजवळ अडवण्यात आला. मुंबई, कर्नाटक, बिहार आणि लखनऊ येथील सीबीआय कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. दरम्यान मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चंदीगडमध्ये काँगेस कार्यकर्त्यांना हटवण्यासाठी पाण्याचे फवारे मारण्यात आले.