पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण यावरून आताच वाद घालत बसलो, तर राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) कमकुवत होईल आणि आपसूकपणे त्याचा कॉंग्रेस आघाडीला फायदा होईल, अशी सबुरीची भूमिका या आघाडीतील एक प्रमुख घटक पक्ष संयुक्त जनता दलाच्या एका ज्येष्ठ नेत्याने घेतली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते हरिकिशोर सिंग यांनी नुकतीच लालकृष्ण अडवानी यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्याजवळ त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.
काही महिन्यांपूर्वी जनता दलाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी एनडीएचा पंतप्रधानपदाचा उमेदवार लवकर जाहीर करण्याची मागणी केली होती. हा उमेदवार निष्कलंक आणि निधर्मी प्रतिमेचा असावा, असेही त्यांनी म्हटले होते. त्यानंतर सिंग यांनी मांडलेल्या मताला महत्त्व प्राप्त झाले. भारतीय जनता पक्षाने आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार निवडणुकीनंतर जाहीर करावा, आम्हाला त्याबद्दल कोणताच आक्षेप नाही, असे सिंग यांनी अडवानींना सांगितले.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची उमेदवारी द्यावी, यासाठी भाजपमधील पक्षश्रेष्ठींवर काही नेते दबाव टाकत आहेत. काही हिंदूत्त्ववादी संघटनांनीही मोदी यांनाच पंतप्रधान करण्याची मागणी केली आहे. त्यापार्श्वभूमीवर जनता दल कोणती भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
अडवानी यांची आपण जनता दलातील ज्येष्ठ नेते या नात्याने भेट घेतल्याचे सिंग म्हणाले. दरम्यान, सिंग यांनी व्यक्त केलेल्या मताशी पक्ष सहमत आहे, असे कोणत्याही नेत्याने अजून अधिकृतपणे सांगितलेले नाही.

Story img Loader