नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सलग चौथ्यांदा ‘ऐतिहासिक’ विजय मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे अभिनंदन केले . बांगलादेशमध्ये रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी बांगलादेशमध्ये केवळ ४० टक्के मतदान झाले. या मतदानाचा निकाल आज लागला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्टमध्ये म्हटलं की, “पंतप्रधान शेख हसिना यांच्याशी बोललो आणि संसदीय निवडणुकीत सलग चौथ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. बांगलादेशातील जनतेचे निवडणुका यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल अभिनंदन केले. आम्ही बांगलादेशसोबत आम्ही लोककेंद्रित भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहोत.”
हेही वाचा >> भारतीयांच्या ‘बॉयकॉट’नंतर मालदीव नरमलं; माजी मंत्री माफी मागत म्हणाले, “आमच्या देशावर बहिष्कार टाकल्यास…”
बांगलादेशात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बांगलादेश नॅशनालिस्ट पार्टीने (बीएनपी) रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार घातल्यामुळे अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाले. प्राथमिक अंदाजानुसार, दिवसभरात ४० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पाच वर्षांपूर्वी, २०१८ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ८० टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद झाली होती.
२००९ पासून हसिना शेख बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत. निवडणुकीपूर्वी बांगलादेशमध्ये हिंसाचार उफाळला होता. त्यामुळे बीएनपी पक्षाने या सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार घातला होता. बांगलादेश निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, एकूण ३०० मतदारसंघांपैकी २९९ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. एका मतदारसंघात अवामी लीगच्या उमेदवाराच्या मृत्यूमुळे तिथे मतदान पुढे ढकलण्यात आले आहे. तर, हसिना यांच्या अवामी लीगने सार्वत्रिक निवडणुकीत २२३ जागा जिंकल्या आहेत. जापा या विरोधी पक्षाला ११ जागा आणि सत्ताधारी पक्षाच्या बंडखोरांसह अपक्ष उमेदवारांना ६१ जागा मिळाल्या आहेत.
जगभरातून कौतुक
रशिया, चीन, भूतान, फिलीपिन्स, सिंगापूर आणि श्रीलंका या देशांच्या राजदूतांनीही पंतप्रधान शेख हसिना यांची भेट घेतली आणि बांगलादेशला पाठिंबा देण्याचे वचन दिले.
विजयानंतर शेख हसीना यांनी सर्वांचे आभार मानले आणि बांगलादेशच्या विकास आणि समृद्धीच्या दिशेने त्यांच्या नवीन सरकारच्या प्रवासात सर्वांचे सहकार्यही मागितले.
निवडणुकीवर घातला होता बहिष्कार
भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सध्या नजरकैदेत असलेल्या आजारी माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख विरोधी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) ने निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.