यूपीए सरकारला समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्या बाहेरून असलेल्या पाठिंब्यावर अवलंबून राहावं लागतंय, त्यामुळेच सरकारच्या स्थैर्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याची कबुली पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी दिली. मात्र, कोणत्याही स्थितीशी लढण्यास आम्ही तयार आहोत आणि यूपीए-२ सरकार आपला कार्यकाळ नक्की पूर्ण करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ब्रिक्स देशांच्या पाचव्या परिषदेसाठी पंतप्रधान दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे गेले होते. तेथून परतताना विशेष विमानात त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. २०१४ मधील लोकसभेच्या निवडणुकांनंतरही आपण सार्वजनिक जीवनात राहू, याचेही संकेत पंतप्रधानांनी दिले. गेल्या जवळपास दहा वर्षांपासून डॉ. सिंग यांच्याकडे केंद्रातील सत्ताधारी यूपीए सरकारचे नेतृत्त्व आहे.
डॉ. सिंग म्हणाले, द्रमुकने केंद्र सरकारचा पाठिंबा काढल्यानंतर सरकारच्या स्थैर्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, आमचे सरकार पूर्णपणे स्थिर असून, ते आपला कार्यकाळ व्यवस्थितपणे पूर्ण करेल. सरकार चालविण्यासाठी आर्थिक सुधारणाशी आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. आर्थिक सुधारणा रोखण्यासाठी कोणी दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही त्याला चोख उत्तर देऊ.
डॉ. सिंग यांनी गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये ८०व्या वर्षात पदार्पण केले. आता या वयात सरकार चालविण्याचा उत्साह अजून टिकून आहे का, या प्रश्नावर डॉ. सिंग म्हणाले, देशाची सेवा करण्याचा मी प्रामाणिक आणि सचोटीने प्रयत्न केलाय. मी त्यात यशस्वी झालो की नाही, हे देशातील सर्वसामान्य जनता ठरवेल.
सपा आणि बसपामुळेच यूपीए सरकारच्या स्थैर्याबद्दल प्रश्नचिन्ह – पंतप्रधान
यूपीए सरकारला समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्या बाहेरून असलेल्या पाठिंब्यावर अवलंबून राहावं लागतंय, त्यामुळेच सरकारच्या स्थैर्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याची कबुली पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी दिली.
First published on: 29-03-2013 at 11:44 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm hints may continue in public life after