लोकसभेत स्थगन प्रस्तावादरम्यान भाजप नेत्यांनी धिंडवडे काढल्याने संतप्त झालेल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली व परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना आवेशात प्रत्युत्तर दिले. स्वराज यांनी बुधवारी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर केलेल्या आरोपांचेही राहुल यांनी खंडन केले. ललित मोदी हे राजकारणी व काळ्या पैशामधील महत्त्वाचा दुवा आहेत. त्यामुळे पंतप्रधान घाबरत असल्याची टीका त्यांनी केली. पंतप्रधान एकही दिवस सभागृहात उपस्थित नव्हते. यावरून त्यांना संसदेबद्दल किती आदर आहे, असा टोला त्यांनी लगावला.
राहुल म्हणाले, नरेंद्र मोदी यांना मोठी संधी आहे. त्यांनी ललित मोदींना पकडून मायदेशी आणावे, असे सांगतानाच मोदी यांना देशवासीयांनी मोठी संधी दिली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर त्यांच्यात दम असल्याचे वाटत होते. पण आता त्यांच्या कार्यक्षमतेविषयी शंका येऊ लागली आहे.
राजीव गांधी यांनी अमेरिकन मित्राला सोडविण्यासाठी भोपाळ गॅस दुर्घटनेस जबाबदार असलेल्या अँडरसनला पलायनाची संधी दिल्याचा आरोप स्वराज यांनी बुधवारी केला होता. त्याचे राहुल यांनी खंडन केले.  माझ्या वडिलांना (राजीव गांधी) न्यायालयाने क्लीन चीट दिली होती. पण इथे तर स्वराज आणि जेटली ललित मोदींना वाचवत आहेत. जर मानवतेच्या मुद्दय़ावर मदत करायची होती तर त्यांनी ती लपूनछपून का केली, असा सवाल त्यांनी या वेळी केला.
अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी काँग्रेसची निदर्शने कायम होती. प्रारंभी लोकसभेत निदर्शने केल्याने त्यांची कोणतीही दखल लोकसभा अध्यक्षांनी घेतली नाही. परिणामी काँग्रेस खासदारांनी सभात्याग करीत संसद आवारातील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ निदर्शने केली.
खरगेंचा पंतप्रधानांवर निशाणा
काँग्रेसचे सभागृहनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, एकही दिवस सभागृहात उपस्थित नसणे ही अहंकाराची सर्वोच्च पातळी आहे. मोदी संसदेचा अवमान करीत आहेत. हा प्रकार कदापि सहन केला जाणार नाही. कामकाज चालविण्यात सरकारला रस नसल्याचे यातून सिद्ध होते. ललित मोदींचा जेटली व स्वराज बचाव करीत आहेत. स्वराज यांनी एकाही आरोपाला उत्तर दिले नाही. त्याऐवजी त्या २०-२५ वर्षांपूर्वी काय झाले याची उदाहरणे देत बसल्या. त्यामुळे त्यांच्यावरील आरोप खोटे ठरत नाहीत.

Story img Loader