संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होताच दोन्ही सभागृहात सुरू असलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर सभागृह तहकूब करावे लागले होते. मंगळवारीही राज्यसभेत विरोधी पक्षांचा गदारोळ सुरूच होता. दरम्यान, राज्यसभेत कोरोनावरील चर्चेदरम्यान विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढविला आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट हल्ला चढविला आणि ते म्हणाले की पंतप्रधान स्वत: जबाबदारी घेत नाहीत पण बळीचे बकरी शोधतात.

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना थाळी वाजवण्याचे, मेणबत्त्या पेटवण्याचे आवाहन केले होते. लोकांनी त्याच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि त्याच गोष्टी केल्या. परंतु त्यांनी आपले वचन पूर्ण केले नाही आणि लोकांना निराश केले. आता जबाबदारी घेण्याऐवजी त्यांनी आरोग्यमंत्र्यांना बळीचा बकरा बनवलं,” असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

“मी देशातील करोना योद्ध्यांना सलाम करतो. डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफने लोकांचे काम करण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला , ज्यांनी दिल्लीत ऑक्सिजन लंगर चालविला किंवा प्लाझ्मा दान केला आणि पीडितांना मदत करण्यासाठी पुढे आले त्यांना मी सलाम करतो,” असे खरगे यांनी म्हटले. गेल्या वर्षीही खरगे यांनी लॉकडाऊनच्या निर्णयासाठी सरकारवर टीका केली होती. नोटाबंदीप्रमाणेच सरकारने रात्रीच लॉकडाऊन जाहीर केले होता असे खरगे म्हणाले होते.

करोना काळातील निवडणूकांवरुन टीका

लॉकडाउनपूर्वी सरकारने कोणतीही तयारी केली नव्हती असे खरगे म्हणाले. लोकांना घरी जाण्यासाठी गाड्या नव्हत्या. गरिबांच्या रोजीरोटीवरही संकट उभे राहिले. सरकारने याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. करोना काळात निवडणुका घेण्याबद्दलही खरगे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, ‘सरकारने लोकांना मास्क घालायला सांगितले होते आणि सोशन डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करण्यास सांगितले होते. पण आपण स्वतः काय करत होता? निवडणुकांच्या वेळी वेगवेगळ्या राज्यात मोठ्या संख्येने मेळावे घेण्यात आले. आपण स्वतःच आपले नियम मोडले. करोनाच्या नियमांचे उल्लंघन झाले असल्यास त्याला सरकार जबाबदार आहे.

Story img Loader