भारत-अमेरिका अणुकरारावरून डाव्या पक्षांनी आणलेल्या दबावापुढे यूपीए सरकार झुकल्यास आपण पदाचा राजीनामा देऊ, अशी धमकी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिली होती. इतकेच नव्हे तर आपला उत्तराधिकारी शोधण्यासही त्यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना सांगितले होते, असा दावा एका पुस्तकात करण्यात आला आहे.
यूपीए-१ राजवटीतील पहिली चार वर्षे पंतप्रधानांचे मीडिया सल्लागार असलेल्या संजय बारू यांनी ‘दी अ‍ॅक्सिडेण्टल प्राइम मिनिस्टर : द मेकिंग अ‍ॅण्ड अनमेकिंग ऑफ मनमोहनसिंग’ हे पुस्तक लिहिले असून, त्यामध्ये सिंग आणि गांधी यांच्यात पडद्यामागे सुरू असलेल्या घडामोडींचा लेखाजोखा मांडला आहे.
भारत-अमेरिका अणुकरारावरून देशात राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असताना बारू यांनी २००८ मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. सदर करार करण्यास पंतप्रधानांपुढे स्वपक्षीयांकडूनच अडचणी निर्माण केल्या जात होत्या, असेही बारू यांनी म्हटले आहे.
डॉ. सिंग यांनी १७ जून रोजी अणुकराराच्या प्रश्नावर सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली. दुसऱ्याच दिवशी सोनिया गांधी आणि तत्कालीन ज्येष्ठ मंत्री प्रणब मुखर्जी यांच्याशीही चर्चा केली. पंतप्रधानांनी त्या दिवशीचे आपले सर्व कार्यक्रम रद्द केले होते, त्यामुळे डॉ. सिंग राजीनामा देणार असे भाकीत वर्तविण्यात येत होते. आपण याबाबत पंतप्रधानांना कल्पना दिली, मात्र कोणतेही वक्तव्य करण्यास आपल्याला मनाई करण्यात आली होती, असे बारू म्हणाले.
डॉ. सिंग यांनी राजीनामा देऊ नये यासाठी त्यांचे मन वळविण्याची जबाबदारी सोनिया गांधी यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉण्टेकसिंग अहलुवालिया यांच्यावर सोपविली होती. त्यानंतर अणुकराराची प्रक्रिया सुरू करण्यात आली आणि डाव्यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर डॉ. सिंग यांनी संसदेत विश्वासदर्शक ठरावजिंकला होता.

Story img Loader