PM Narendea Modi Joins Ghibli Trend: इंटरनेटवर काही दिवसांपासून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून घिब्ली शैलीतील छायाचित्रे तयार करण्याचा ट्रेंड चांगलाच गाजत आहे. या ट्रेंडमध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी झाले आहेत. नुकतेच केंद्र सरकारने माय गव्हर्नमेंट इंडिया या एक्स अकाउंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींची घिब्ली शैलीतील काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत.

ते फक्त पात्र नाहीत…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घिब्ली शैलीतील छायाचित्रे शेअर करताना गव्हर्नमेंट इंडियाच्या अकाउंटवर, “मुख्य पात्र? नाही. ते पूर्ण कथानक आहेत. स्टुडिओ घिब्ली स्ट्रोकमध्ये नव्या भारताचा अनुभव घ्या,” अशी पोस्टही लिहिण्यात आली आहे. या पोस्टबरोबर पंतप्रधान मोदींची घिब्ली शैलीतील १२ छायाचित्रे शेअर केली आहेत.

या १२ छायाचित्रांमध्ये, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत पंतप्रधान मोदींच्या बैठकींचे घिब्ली शैलीतील चित्रण शेअर केले आहे. तसेच यामध्ये पंतप्रधान मोदी भारतीय लष्कराच्या गणवेशात, २०२३ मध्ये नवीन संसदेच्या उद्घाटनावेळी हातात सेंगल घेतलेले आणि प्रभू श्रीरामांची पूजा करतानाही दाखवण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री फडणवीसांनाही भुरळ

दरम्यान या ट्रेंडमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काँग्रेस खासदार शशी थरूरही सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरचे घिब्ली शैलीतील छायाचित्र एक्सवर शेअर केले आहे. या छायाचित्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि कन्या दिविजा दिसत आहेत.

शशी थरूर म्हणाले, मला तर…

काँग्रेस नेते शशी थरूर यांनीही त्यांचे घिब्ली शैलीतील छायाचित्र एक्सवर पोस्ट केले आहे. एक्सवरील त्यांच्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, “मी घिब्ली ट्रेंडमध्ये सहभागी झालो आहे! ही माझ्या कार्यकर्त्यांनी आणि हितचिंतकांनी पाठवलेली छायाचित्रे आहेत. आतापर्यंत घिब्ली काय आहे हे मला माहित नव्हते, परंतु या नवीन ट्रेंडमुळे मला आता याबाबात उत्सुकता निर्माण झाली आहे.

इंटरनेटवर घिब्लीचा धुमाकूळ

ओपनएआयच्या चॅट जीपीटीने सुरू केलेल्या या सेवेनंतर अनेक युजर्सनी घिब्ली शैलीतील एलोन मस्क आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची छायाचित्रे शेअर केली आहेत. याचबरोबर या छायाचित्रांमध्ये द लॉर्ड ऑफ द रिंग्जमधील दृश्ये आणि अगदी ११ सप्टेंबरच्या हल्ल्यांचे चित्रणही दर्शविले आहे. तसेच बॉलिवूड चित्रपटांमधील फिर हेरा फोरी, बाहुबली, भुलभुलैय्या आणि शाहरूख खानच्या जगप्रसिद्ध दिलवाले दुल्हनिया ले जायेंग यातील काही दृश्यांच्या छायाचित्रांचाही समावेश आहे.