PM Narendra Modi Writes Post About Maha Kumbh On X: उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये ४५ दिवस चाललेल्या महाकुंभमेळ्याची नुकतीच सांगता झाली. या महाकुंभमेळात जगभरातील कोट्यवधी भाविकांनी श्रद्धेने आणि भक्तीने त्रिवेणी संगमात स्नान केले. गुरुवारी महाकुंभमेळ्याच्या समारोपप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, एकतेचा महान यज्ञ पूर्ण झाला आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी महाकुंभमेळ्यादरम्यान भाविकांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली.

…तर माफी मागतो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत लिहिले की, ‘महाकुंभ संपन्न झाला… एकतेचा महायज्ञ संपन्न झाला.’ प्रयागराजमधील ४५ दिवस चाललेल्या एकतेच्या महाकुंभात १४० कोटी देशवासीय ज्या पद्धतीने एकाच वेळी एकत्र आले, ते सर्वोत्तम होते. मला माहिती आहे, इतका मोठा कार्यक्रम आयोजित करणे सोपे नव्हते. मी गंगा माता, यमुना माता, सरस्वती माता यांना प्रार्थना करतो, हे माते, जर आमच्या उपासनेत काही कमतरता असेल तर मला क्षमा करा. जर मी भक्तांची सेवा करण्यात कमी पडलो असेल, तर माझ्यासाठी देवाचे रूप असलेल्या जनतेचीही माफी मागतो.”

महाकुंभमेळा अभ्यासाचा नवीन विषय

पंतप्रधान मोदींनी आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “प्रयागराजमध्ये आयोजित केलेला हा महाकुंभमेळा आधुनिक काळातील मॅनेटमेंट प्रोफेशनल्ससाठी, नियोजन आणि धोरण तज्ञांसाठी अभ्यासाचा नवीन विषय बनला आहे. आज, संपूर्ण जगात कुठेही इतक्या मोठ्या कार्यक्रमाची तुलना होऊ शकत नाही, असे दुसरे कोणतेही उदाहरण नाही. त्रिवेणी संगमात एकाच नदीकाठी इतक्या मोठ्या संख्येने, कोटींच्या संख्येने लोक कसे जमले हे पाहून संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले आहे.”

वारशाचा अभिमान असलेला भारत आता…

महाकुंभमेळ्याबाबतच्या पोस्टच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले की, “कल्पनेपेक्षा खूप जास्त संख्येने भाविक प्रयागराजला आले होते. प्रशासनानेही मागील कुंभमेळ्यातील अनुभवांवर हा अंदाज लावला होता. अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा जवळजवळ दुप्पट भाविकांनी एकतेच्या या महाकुंभात भाग घेतला आणि पवित्र स्नान घेतले. जर आध्यात्मिक क्षेत्रात संशोधन करणाऱ्या लोकांनी कोट्यवधी भारतीयांच्या या उत्सवाचा अभ्यास केला तर त्यांना आढळेल की, आपल्या वारशाचा अभिमान असलेला भारत आता एका नवीन उर्जेने पुढे जात आहे. मला वाटतं, हा युग बदलाचा आवाज आहे, जो भारताचे नवे भविष्य लिहिणार आहे.”

Story img Loader