गुजरातमधील पटेल समाजाच्या आंदोलनाची दखल पंतप्रधानांना घ्यावी लागली आहे. हिंसेने आजवर कोणाचेही भले झाले नाही. गुजरातमधील जनतेने शांतता राखावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील आंदोलकांना केले आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन काम केल्यानेच देशाचा विकास शक्य आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे पण हिंसाचार योग्य नाही. शांतीपूर्ण पद्धतीने प्रश्नाचे समाधान झाले पाहिजे, असे मोदी यावेळी म्हणाले.
हिंसेचा वणवा: अहमदाबाद, सूरत, मेहसाणामध्ये जाळपोळ, दगडफेक
दरम्यान, गुजरातमधील पटेल समाजाच्या आंदोलनाला मंगळवारी रात्रीपासून हिंसक वळण लागले असून, राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी दगडफेक, जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. निमलष्करी दलाचे पाच हजार जवान गुजरातमध्ये पाठविण्यात आले असून, वेगवेगळ्या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पटेल समाजाचा इतर मागासवर्गीयांमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी तरूण नेता हार्दिक पटेल याच्या नेतृत्त्वाखाली मंगळवारी अहमदाबादमध्ये जाहीर सभा घेण्यात आली. या सभेला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. या सभेनंतर हार्दिक पटेल याला मंगळवारी रात्री पोलीसांनी ताब्यात घेतले होते. त्याची बातमी पसरताच आंदोलनाला हिंसक वळण लागले.

Story img Loader