PM Narendra Modi & Dhirendra Krushna Shastri: बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतात. कधी त्यांच्या विधानांमुळे, कधी त्यांच्या चमत्काराच्या दाव्यांमुळे तर कधी कुठल्या वादामुळे. पण आता पंडित धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आले आहेत. पण ही चर्चा त्यांचं लग्न झाल्याची नसून त्यांच्या लग्नाला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याची चालू आहे. कारण स्वत: पंतप्रधान मोदींनी आपण बागेश्वर धाम सरकार पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या लग्नाला उपस्थित राहणार असल्याचा शब्द त्यांना दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते रविवारी बागेश्वर धाम मेडिकल अँड सायन्स रिसर्च इन्स्टिट्यूटचं भूमिपूजन पार पडलं. यावेळी धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या भाषणात केलेल्या उल्लेखावरून पंतप्रधान मोदींनी मिश्किल टिप्पणी केली. धीरेंद्र शास्त्रींच्या लग्नाच्या मुद्द्यावर मोदींनी केलेल्या टिप्पणीनंतर सभास्थानी चांगलाच हशा पिकला. स्वत: धीरेंद्र शात्रींसह व्यासपीठावरील सर्व मान्यवरदेखील यात सामील झाले.
नेमकं काय घडलं?
भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित सभेत आधी बागेश्वर धामचे पंडिच धीरेंद्र शास्त्री यांनी पंतप्रधानांना रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केलं. “तुम्ही माझ्या लग्नाला भले नका येऊ, पण या रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी नक्की या”, अशी विनंती धीरेंद्र शास्त्रींनी करताच खुद्द पंतप्रधान मोदीही हसू लागले. “पंतप्रधान मोदी जेव्हा माझ्या आईला भेटले तेव्हा ते म्हणाले मी तुमची चिठ्ठी काढतोय. त्यांना म्हणाले की तुमच्या मनात मुलाचं लग्न व्हावं हे आहे. त्यांनी माझ्या आईसाठी शालही आणली. मोदींच्या या भावना पाहून मी तिथेच बसल्या बसल्या निर्णय घेतला की पंतप्रधान मोदींच्या आईच्या नावाने या रुग्णालयात एक वॉर्ड तयार केला जाईल”, अशी घोषणा धीरेंद्र शास्री यांनी केली.
पंडित धीरेंद्र शास्त्री हे बागेश्वार धाम येथे दर्शनासाठी येणाऱ्या लोकांच्या इच्छांबाबतच्या चिठ्ठ्या काढून त्यावर त्यांना मार्गदर्शन करत असतात. त्याचाच संदर्भ घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धीरेंद्र शास्त्री यांच्या आईची भेट घेतल्यानंतर त्यावर मिश्किल टिप्पणी केली होती. त्याबाबत धीरेंद्र शास्त्रींनी आपल्या भाषणात उल्लेख केला. पण मोदींनीही नंतर आपल्या भाषणात यावर टोलेबाजी केली.
“धीरेंद्र शास्त्री एकटेच चिठ्ठी काढणार का?”
धीरेंद्र शास्त्रींच्या चिठ्ठी काढण्याच्या पद्धतीचा उल्लेख मोदींनी भाषणात करताना मिश्किल टिप्पणी केली. “आज मी हनुमान दादांच्या चरणी आलो, तेव्हा मला वाटलं की हे धीरेंद्र शास्त्री एकटेच चिठ्ठी काढणार की मीही काढू शकेन? हनुमान दादांची माझ्यावर कृपा होते की नाही ते मी आज पाहिलं. हनुमान दादाजींनी मला आशीर्वाद दिला. मी आज पहिली चिठ्ठी काढली. ती धीरेंद्र शास्त्रींच्या आईची निघाली. तेव्हा काय घडलं हे शास्त्रींनी तुम्हाला सांगितलंच आहे. ही फार मोठी संधी आहे, फार मोठं काम आहे. संकल्प मोठा असेल आणि संतांचे आशीर्वाद असतील तर सगळंकाही वेळेत पूर्ण होतं. तुम्ही म्हणालात या प्रकल्पाच्या उद्घाटनाला मी यावं, दुसरं तुम्ही म्हणालात की तुमच्या लग्नासाठी मी यावं. मी आज इथे जाहीरपणे सांगतो की दोन्ही गोष्टी मी करेन”, असा शब्द यावेळी मोदींनी धीरेंद्र शास्त्रींना दिला.