हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आरक्षणाविरोधात आहेत. त्यांना आरक्षण हटवायचे आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निर्मल येथील प्रचारसभेत केला. अदिलाबाद लोकसभा मतदारसंघात हा भाग येतो.
लोकसभा निवडणूक ही दोन विचारधारांमधील लढाई असल्याचा दावा राहुल यांनी केला. घटनेचे संरक्षण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे तर दुसरीकडे जनतेचे हक्क संपुष्टात आणण्याचा भाजप-संघाचा डाव आहे, असा आरोप राहुल यांनी केला. ५० टक्क्यांवरून आरक्षणाची मर्यादा वाढविणे हा देशापुढील मोठा मुद्दा आहे. काँग्रेसने याबाबत जाहीरनाम्यात आश्वासन दिल्याचे राहुल यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >>> काँग्रेसला मोठा धक्का; राधिका खेडा यांचा राजीनामा; म्हणाल्या, “माझ्याच पक्षात माझा पराभव”
सरकारी कार्यालये तसेच सार्वजनिक क्षेत्रातील कंत्राटी पद्धत आम्ही रद्द करू असे आश्वासन राहुल यांनी दिले. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा आम्ही हटवू असे पंतप्रधानांनी एकाही भाषणात म्हटले नाही असा दावा राहुल यांनी केला. पंतप्रधानांनी केवळ वीस ते २२ लोकांची १६ लाख कोटींची कर्जे माफ केली असा आरोप राहुल यांनी केला. तेलंगणमधील काँग्रेस सरकारने आपली आश्वासने पूर्ण केल्याचे त्यांनी नमूद केले. काँग्रेसच्या प्रस्तावित जातनिहाय जनगणनेने देशाचे राजकारण बदलून जाईल असे त्यांनी नमूद केले.
रायबरेली, अमेठीत प्रचाराची सूत्रे प्रियंकांकडे
नवी दिल्ली: अमेठी व रायबरेली या उत्तर प्रदेशातील दोन्ही मतदारसंघात काँग्रेसच्या प्रचाराची धुरा प्रियंका गांधी यांच्याकडे असेल. रायबरेलीतून राहुल गांधी तर अमेठीतून किशोरीलाल शर्मा हे उमेदवार आहेत. निवडणूक संपेपर्यंत प्रियंका या तेथेच थांबतील असे सूत्रांनी स्पष्ट केले. राहुल गांधी हे देशभर प्रचारात व्यग्र असल्याने गांधी कुटुंबाच्या या दोन्ही पारंपरिक मतदारसंघांत पक्षाची सारी भिस्त प्रियंकांवर असेल. या दोन्ही मतदारसंघांत २० मे रोजी मतदान आहे.