Pahalgam Terror Attack Updates: जम्मू-काश्मीरमधील पहलगामजवळ काल पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यादरम्यान सौदी अरेबियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा दौरा रद्द करत तातडीने मायदेशी परतले होते. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी जेद्दाहहून नवी दिल्लीला परतत असताना त्यांच्या विमानाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर टाळल्याची माहिती समोर आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानाने मंगळवारी रात्री उशिरा सौदी अरेबियाहून उड्डाण केले तेव्हा त्यांच्या विमानाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून उड्डाण टाळले. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइटवरील माहितीनुसार पंतप्रधान मोदींचे भारतीय हवाई दलाचे बोईंग ७७७-३०० विमान मंगळवारी सकाळी रियाधला उड्डाण करताना पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून गेले होते, परंतु परत येताना या विमानाने मोठा वळसा घेत पाकिस्तानची हवाई हद्द टाळली.
सौदी अरेबियाहून परतताना पंतप्रधानांच्या विमानाने अरबी समुद्रावरून थेट उड्डाण केले आणि नंतर भारतीय द्वीपकल्प ओलांडत गुजरातमार्गे भारतात प्रवेश केला आणि नंतर दिल्लीला परतले. याबाबत एनडीटीव्हीने वृत्त दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परतीच्या प्रवासाचा मार्ग बदलण्यामागे पाकिस्तानकडून येणाऱ्या धोक्याची शक्यता होती. पंतप्रधान आणि त्यांच्या शिष्टमंडळाच्या सुरक्षेसाठी सुरक्षा यंत्रणांनी पंतप्रधान मायदेशी येताना त्यांच्या विमानाचा मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला.
पंतप्रधान मोदी आज सकाळीच दिल्लीतील पालम हवाई दल तळावर उतरले, त्यानंतर त्यांनी तातडीने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशी बैठक घेतली.
पंतप्रधानांची पोस्ट
दरम्यान या हल्ल्याची माहिती मिळाल्यनंतर पंतप्रधान मोदी यांनी या हल्ल्याचा एक्सवर पोस्ट लिहित निषेध केला. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “या घृणास्पद कृत्यामागील जे कोण आहेत त्यांना सोडले जाणार नाही. त्यांचा दुष्ट अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आमचा निर्धार अढळ आहे.”
हल्ल्यामागे टीआरएफ
दरम्यान या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी रेझिस्टन्स फ्रंटने (टीआरएफ) स्वीकारली आहे. टीआरएफ ही पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाची शाखा आहे. दक्षिण आशिया दहशतवाद पोर्टलमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०१९ मध्ये ‘कलम ३७०’ रद्द केला आणि भारत सरकारने जम्मू व काश्मीरचा विशेष घटनात्मक दर्जा रद्द करून, दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले. त्यानंतर टीआरएफ हा गट अस्तित्वात आला. तोपर्यंत काश्मीरमध्ये काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिदीन, लष्कर-ए-तैयबा व जैश-ए-मोहम्मद यांसारख्या दहशतवादी संघटना सक्रिय होत्या. रेझिस्टन्स फ्रंटच्या नेतृत्वात साजिद जट्ट, सज्जाद गुल व सलीम रहमानी यांचा समावेश आहे. हे सर्व दहशतवादी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित आहेत.