गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराला आज अखेर मुहूर्त मिळाला असून एकूण १२ विद्यमान मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यासोबतच एकूण ४३ मंत्र्यांचा आज शपथविधी पार पडला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ४ खासदारांचा समावेश आहे. त्यात नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील आणि भागवत कराड यांचा समावेश आहे. दुसरीकडे केंद्रातील विद्यमान मंत्र्यांपैकी आरोग्यमंत्री हर्ष वर्धन, प्रकाश जावडेकर, रवीशंकर प्रसाद यांनी देखील राजीनामे दिले आहेत. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ४३ मंत्र्यांना शपथ देण्यात आली.
आणखी वाचा
एकूण ४३ मंत्र्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली असून त्यामध्ये ७ महिला मंत्र्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातल्या ४ मंत्र्यांनी शपथ घेतली असून उत्तर प्रदेशच्या ७ मंत्र्यांचा समावेश आहे. नारायण राणे यांनी आज सर्वप्रथम शपथ घेतली.
नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल निवडणुकांमध्ये ज्या ठिकाणी हिंसाचाराला सुरुवात झाली, त्या कूच बेहेर मतदारसंघाचे भाजपा खासदार निसिथ प्रामाणिक यांचा राज्यमंत्री म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.
भाजपाचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष डॉ. एल. मुरुगन यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे.
पश्चिम बंगालच्या अलिपूरदुआ मतदारसंघातून जॉन बारला भाजपाच्या तिकिटावर २०१९मध्ये निवडून आले आहेत.
गुजरातमधील सुरेंद्रनगर मतदारसंघातील भाजपाचे खासदार मुंजपारा महेंद्रभाई यांचा देखील राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.
पश्चिम बंगालच्या बानगाव मतदारसंघातून निवडून आलेले भाजपा खासदार शांतनू ठाकूर यांची देखील मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. २०१९च्या निवडणुकीत ते जिंकून आले होते. पहिल्यांदाच त्यांच्या रुपाने या मतदारसंघातून तृणमूलव्यतिरिक्त इतर पक्षाचा उमेदवार निवडून आला होता.
ओडिशाच्या मयूरभंज मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेलेले खासदार विश्वेश्वर टुडू यांना राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत ते विजयी झाले होते.
भारती पवार यांचा कौटुंबिक पार्श्वभूमी असून देखील राष्ट्रवादीसोबत ताळमेळ बसला नाही. गृहकलहामुळे आणि राष्ट्रवादीत दुय्यम वागणूक मिळत असल्याने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपात प्रवेश केला. २०१९ ला दिंडोरी मतदारसंघातून त्या भाजपाकडून खासदार म्हणून निवडून आल्या. स्वत:ची यंत्रणा आणि आता सत्ताधारी भाजपाची ताकद मिळाल्याने दिंडोरीत त्यांची ताकद वाढली आहे.
भाजपाचे मणिपूरमधील खासदार राजकुमार रंजनसिंह उर्फ आर. के. रंजनसिंह यांना राज्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली आहे.
१९९८ साली औरंगाबाद शहराचा उपमहापौर म्हणून भागवत कराड यांची निवड झाली. नंतर १९९९ आणि २००६ असे दोन वेळा ते औरंगाबाद शहराचे महापौर होते. २००९ साली गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली. २०२० मध्ये डाॅ. कराड यांना भाजपाकडून राज्यसभेची खासदारकी देण्यात आली.
भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. २०१४ साली कपील पाटील यांना भिवंडी मतदार संघातून लोकसभेचं तिकीट मिळालं आणि ते प्रचंड मताधिक्याने निवडून आले. २०१९ मध्ये पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी केंद्रात विविध संसद समित्यांवर सदस्य म्हणून काम पाहिलं आहे. लोकसभेत त्यांनी पक्षाचे व्हीप म्हणून जबादारी पार पाडली आहे. सरपंच ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा प्रवास राहिला आहे.
भाजपाचे कर्नाटकच्या बिडार मतदारसंघातील खासदार भगवंत गुरुबसप्पा खुबा यांना राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे.
भागलपूरचे खासदार अजय कुमार मंडल यांना राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे.
भाजपाचे उत्तराखंड प्रदेशाध्यक्ष आणि नैनीताल मतदारसंघातील खासदार अजय भट्ट यांना राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली.
२००९, २०१४ आणि २०१९ अशी सलग तीन वेळा गुजरातच्या सूरत मतदारसंघातून निवडणूक जिंकलेल्या भाजपाच्या दर्शना जरदोश यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.
राज्यसभेचे सदस्य असलेले राजीव चंद्रशेखर यांना राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आले आहे.
मूळचे समाजवादी पक्षाचे असलेले सत्यपाल सिंह बघेल यांनी २०१९मध्ये भाजपामध्ये प्रवेश करत निवडणूक जिंकली. त्यांचा देखील राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर मतदारसंघाचं २०१४ पासून प्रतिनिधित्व करणाऱ्या अनुप्रियासिंह पटेल यांनी आज राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांनी याआधी महिला व बालकल्याण विभागाच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली आहे.
करोना काळात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासोबत वेगवेगळ्या योजनांची पत्रकार परिषदेतून घोषणा करणारे अनुराग ठाकूर यांनी देखील आज मंत्रिपदाची शपथ घेतली.
भाजपाचे गुजरातमधील खासदार पुरुषोत्तम रुपाला यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी पंचायत राज मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली आहे.
देशाच्या नागरी उड्डाण मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळलेले हरदीपसिंग पुरी यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
लोकजनशक्ती पक्षात उभी फूट पडल्यानंतर देखील संसदेमध्ये पक्षाच्या नेतेपदी असणारे पशुपती कुमार पारस यांनी त्यांना विरोध करणारे चिराग पासवान यांच्या समोर आव्हान उभं केलं होतं. चिराग पासवान यांनी मोदींना आवाहन करून देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष करत पशुपतीकुमार पारस यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.
२०१९पासून राज्यसभेमध्ये ओडिशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अश्विनी वैष्णव यांना देखील केंद्रीय मंत्रीपद देण्यात आलं आहे.
काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपामध्ये दाखल झालेल्या ज्योतिरादित्य सिंदिया यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. ज्योतिरादित्य सिंदिया काँग्रेसमध्ये असताना राहुल गांधींच्या जवळचे मानले जात होते.
राष्ट्रपती भवनातल्या दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडत असून शपथ ग्रहण करणारे सर्व ४३ खासदार हॉलमध्ये उपस्थित आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर पहिलीच शपथ नारायण राणे यांनी घेतली असून त्यांनी हिंदी भाषेतून शपथ घेतली आहे.