केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज मोठा विस्तार झाला असून एकूण ४३ मंत्र्यांनी आज शपथ घेतली. यामध्ये महाराष्ट्राच्या चार मंत्र्यांचा देखील समावेश असून त्यातलं सर्वात चर्चेत असलेलं नाव म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचं. दोन वर्षांपूर्वीच नारायण राणेंनी भाजपामध्ये प्रवेश केला असून त्यांना लगेच मंत्रिपदाची देखील संधी देण्यात आली असल्यामुळे त्याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मात्र, दुसरीकडे नारायण राणेंनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी चार व्यक्तींचे प्रामुख्याने आभार मानले असून त्यांचे ऋणी असल्याचं सांगितलं आहे. “आज मी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आभारी आहे. त्यांच्यामुळेच मी आज मंत्री बनलो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी जबाबदारी देतील, ती मी संभाळेन”, असं राणे यावेळी म्हणाले.
…त्यांच्या आज्ञेप्रमाणे काम करीन!
दरम्यान, आपण आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज्ञेप्रमाणे काम करू, असं देखील राणेंनी यावेळी नमूद केलं. “सुरुवातीला मुंबई पालिकेत १९८५मध्ये नगरसेवक झालो. मग बेस्टमध्ये चेअरमन झालो. मग आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, पुन्हा आमदार, खासदार आणि आता मंत्रीपदाची शपथ घेतोय याचं सर्व श्रेय नरेंद्र मोदी, अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं आहे. त्यांचा मी ऋणी आहे. मोदी देतील ती जबाबदारी मी सांभाळीन. त्यांच्या आज्ञेप्रमाणे मी काम करीन. महाराष्ट्राला मंत्रीपद मिळाल्याने महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी मी काम करीन”, असं राणेंनी नमूद केलं.
“अनेक चढ-उतार आले. पण शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या कृपेने, सहकार्याने, आशीर्वादाने मला हे पद मिळालं आहे. मी त्यांचा ऋणी आहे. त्यांनी टाकलेला विश्वास मी सार्थ ठरवीन”, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं.
समजून घ्या : नारायण राणेंना केंद्रात मंत्रीपद दिल्याने भाजपाला काय फायदा होणार?
…म्हणून माझा पहिला नंबर लागला!
मंत्रिमंडळाच्या शपथविधीमध्ये नारायण राणेंनी सर्वात आधी शपथ घेतली. त्याविषयी देखील राणेंनी यावेळी कारण सांगितलं. “ज्येष्ठतेनुसार ही व्यवस्था लावण्यात आली होती. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहिलो आहे. ७ टर्म मी आमदार राहिलो आहे. त्यासाठीच माझा पहिला नंबर लागला”, असं ते म्हणाले.