संपूर्ण देशाची नजर राजधानी दिल्लीकडे लागली आहे. सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात असून, राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली सुरू आहेत. महत्त्वाचं म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याबरोबरच मंत्रिमंडळाचा चेहरामोहराच बदलला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कारण केंद्रीय आरोग्यमंत्री, केंद्रीय शिक्षणमंत्री यांच्यासह अनेक महत्त्वाच्या खात्यातील मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अनेक मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले असून, तब्बल ४३ जण मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं वृत्त आहे. दरम्यान, एकीकडे मंत्र्यांचे राजीनामे घेतले जात असतानाच सहा मंत्र्यांना प्रमोशन दिलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर हा विस्तार करत असताना सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा प्रयत्न भाजपाकडून होताना दिसत आहे.

संसदेचं पावसाळी अधिवेशन होण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. ही चर्चा खरी ठरली असून, अखेर आज मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. सायंकाळी होत असलेल्या शपथविधी सोहळ्यापूर्वी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले जाण्याचे संकेत भाजपाने दिले आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, सदानंद गौडा, केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांच्यासह काही कॅबिनेट आणि काही राज्यमंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तर दुसरीकडे काही राज्यातील विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन काही मंत्र्यांची बढती (प्रमोशन) केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा- Modi Cabinet Expansion : महाराष्ट्रातील दोन बड्या मंत्र्यांना मोदींच्या मंत्रीमंडळातून डच्चू

यात हरदीप पुरी, अनुराग ठाकूर, जी. किशन रेड्डी, किरन रिजिजू, आर.के. सिंग, मनसुख मांडविया, पुरुषोत्तम रुपाला यांची नावे चर्चेत आहे. पुढील वर्षी वेगवेगळ्या राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन प्रमोशन दिलं जाणार असल्याचं वृत्त आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, गोवा, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होत आहे. मंत्रिमंडळ विस्तार करताना या निवडणुकाही डोळ्यासमोर ठेवल्या आहेत. हरदीपसिंह पुरी यांच्यावर सध्या नागरी उड्डाण खात्यासह तीन खात्याची जबाबदारी आहे. यात नागरी विकास मंत्रालय आणि वाणिज्य मंत्रालयाचाही समावेश आहे. ते शीख असून, पुढील वर्षी पंजाबमध्ये निवडणुका होत असल्यानं त्यांना बढती दिली जाऊ शकते.

दुसरीकडे अनुराग ठाकूर यांनाही याच कारणाने प्रमोशन दिलं जाणार असल्याची माहिती आहे. अनुराग ठाकूर सध्या केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बढती दिली जाणार आहे. ठाकूर यांच्याबरोबर मनसुख मांडविया आणि पुरुषोत्तम रुपाला यांनाही प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. दोघंही पटेल समुदायाचं प्रतिनिधीत्व करतात. त्यांच्यावर स्वतंत्र मंत्रालयाचा पदभार सोपवला जाऊ शकतो. तर आरके सिंह जे सध्या ऊर्जा मंत्री आहेत. त्यांचा कॅबिनेट मंत्र्यांमध्ये समावेश केला जाऊ शकतो.

असं असेल मोदींचं सोशल इंजिनिअरिंग…

मंत्रिमंडळ विस्तार करत असताना जात, धर्मनिहाय संतुलन साधण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. यालाच राजकारणात सोशल इंजिनिअरिंग संबोधलं जातं. मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात ५ अल्पसंख्याक मंत्र्यांचा समावेश केला जाणार आहे. यात १ मुस्लीम, १ शीख, २ बौद्ध आणि एक ख्रिश्चन असणार आहे. त्याचबरोबर २७ मंत्री ओबीसी समुदायातील असणार आहेत. यात ५ जणांना कॅबिनेट मंत्री केलं जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अनुसूचित जमातीतील ८ जणांना मंत्रिमंडळात घेतलं जाणार आहे. ज्यात तिघांना कॅबिनेट मंत्रीपद दिली जाऊ शकतात. तर १२ मंत्री अनुसूचित जातीतील असतील आणि यातील २ दोघांना कॅबिनेट मंत्री बनवलं जाण्याची शक्यता आहे.

Story img Loader