बारी (इटली) : सर्वसमावेशक आणि शाश्वत प्रगतीसाठी तंत्रज्ञानातील मक्तेदारी मोडीत काढणे आवश्यक असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी इटलीत सुरू झालेल्या दोन दिवसीय जी ७ शिखर परिषदेत व्यक्त केले.कृत्रिम प्रज्ञा अर्थात एआयच्या क्षेत्रात जागतिक सुशासनाची गरज विशद करताना, याविषयी नियमनाच्या मुद्द्यावर भारताने मांडलेल्या भूमिकेचाही त्यांनी उल्लेख केला. लोकसभा निवडणुकीनंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतरचा मोदींचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय दौरा आहे.
अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा, इटली आणि जपान या जगातील श्रीमंत देशांच्या जी ७ समूहाची ५०वी परिषद इटलीत सुरू आहे. यंदा व्यापक जगताचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आणि आशिया व आफ्रिकेतील देशांना महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चेत सहभागी करून घेण्यासाठी ‘आऊटरीच’ उपक्रम परिषदेमध्ये अंतर्भूत करण्यात आला. या उपक्रमाचे निमंत्रित म्हणून मोदी गेले आहेत.
हेही वाचा >>> इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनींनी मोदींना केलेलं ‘नमस्ते’ चर्चेत, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
तंत्रज्ञान विध्वंसक नव्हे, तर विधायक असले पाहिजे. तरच त्याचा प्रभाव अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. भारताने नेहमीच मानवाभिमुख तंत्रज्ञान प्रसाराला प्राधान्य दिले, असे मोदी यांनी सांगितले. ‘कृत्रिम प्रज्ञा हे यासंदर्भातील एक उदाहरण आहे. ‘एआय फॉर ऑल’ हे भारतातील एआय मिशनचे प्रधान उद्दिष्ट आहे. एआयच्या क्षेत्रातील जागतिक भागीराच्या मोहिमेचा भारत एक संस्थापक देश आहे,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.
आशियाई आणि आफ्रिकी देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘ग्लोबल साउथ’ समूहाचे प्रश्न जागतिक मंचावर मांडण्यासाठी भारताने पुढाकार घेतला आहे. यासाठीच जी-२० समूहामध्ये आफ्रिकन युनियनचा सदस्य म्हणून समावेशाबाबत भारत आग्रही राहिला, याचा पंतप्रधानांनी उल्लेख केला.
भारतात नुकत्याच झालेल्या निवडणुका पारदर्शी आणि तंत्रज्ञानाधारित होत्या. भारतीय जनतेने मला निवडून दिले हे भाग्य मानतो. हा ऐतिहासिक विजय संपूर्ण लोकशाही जगताचा आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान