गेल्या आठवड्याभरात झालेल्या भारत-पाकिस्तान दरम्यानच्या महत्वाच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी सध्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, संरक्षणमंत्री निर्मला सितारामण यांच्यासह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि परराष्ट्र सचिव विजय गोखले हे देखील उपस्थित आहेत. त्यामुळे या बैठकीत काहीतरी महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा सुरु असल्याचे कळते. मात्र, अद्याप या चर्चेचा तपशिल कळू शकलेला नाही.
PM Modi chairs National Security Council meet, minister of CCS present in addition to NSA Ajit Doval and Foreign Secretary Gokhale. pic.twitter.com/jeEkEhAU79
— ANI (@ANI) March 3, 2019
देशाच्या सुरक्षा व्यवस्थेसंबंधीची ही सर्वोच्च बैठक असते. त्यामुळे या बैठकीत निश्चितच काही तरी महत्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत जैश-ए-महंम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे अशी मागणी भारताने केली आहे. तसेच आज काही तासांपासून मसूदचा पाकिस्तानात मृत्यू झाल्याच्या बातम्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर या बैठकीत महत्वाची चर्चा होऊ शकते.
जैशने पुलवामात घडवून आणलेल्या आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. या घटनेचा वचपा काढण्यासाठी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून त्यांच्या बालाकोट भागातील जैशचे प्रशिक्षण तळ उद्धवस्त केले होते. भारताच्या या धडक कारवाईनंतर खवळलेल्या पाकिस्तानने नियंत्रण रेषेजवळ वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. आजच हंडवाडामध्ये तीन दिवसांपासून सुरु असलेली एक चकमक संपली. यामध्ये भारताचे ५ जवान शहीद झाले. इतकेच नव्हे तर त्यांनी थेट भारताच्या हवाई हद्दीचे उल्लंघन करीत भारताच्या लष्करी संस्थांना टार्गेट केले होते.
या सर्व पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे.