संसदेचं पावसाळी अधिवेशन चालू असून आज (२ जुलै) अधिवेशनाचा सातवा दिवस आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत भाषण केलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच त्यांनी माजी पंतप्रधान दिवंगत पंडित नेहरूंवरही गंभीर आरोप केले. मोदी म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहरूंच्या दलित आणि वंचितविरोधी धोरणांविरोधात आवाज उठवल्यामुळे नेहरूंनी बाबासाहेबांची राजकीय कारकीर्द संपवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. तसेच बाबासाहेबांना निवडणुकीत पराभूत करून विजयोत्सव साजरा केला.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशातील सरकारे पाडणे, प्रसारमाध्यमांना दाबून ठेवणे हे काँग्रेसचे उद्योग आहेत. त्यांनी नेहमीच संविधानाच्या मूळ भावनेविरोधात, त्यातील कलमांविरोधात, संविधानातील प्रत्येक शब्दाविरोधात जाऊन कारवाया केल्या आहेत. त्यांनी सुरुवातीपासून देशातील दलितांवर व वंचितांवर अन्याय केला आहे. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसच्या या विचारधारेचा विरोध केला. काँग्रेसच्या दलितविरोधी, वंचितविरोधी मानसिकतेला कंटाळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पंडित नेहरू यांच्या कॅबिनेटमधून (केंद्रीय मंत्रिमंडळातून) राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचा पर्दाफाश केला होता. पंडित नेहरू कशा पद्धतीने दलितांवर, वंचितांवर अन्याय करत आहेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगासमोर मांडलं. बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूंच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देताना जी काही कारणं सांगितली आहेत, ती कारणं काँग्रेसच खरंच चरित्र दर्शवतात.
मोदी म्हणाले, बाबासाहेब आंबेडकर मंत्रिपदाचा राजीनामा देत म्हणाले होते की सरकारने अनुसूचित जातींमधील लोकांच्या उपेक्षा केली आहे. त्यामुळे माझ्या मनात आक्रोश निर्माण झाला आहे आणि तो आक्रोश मी रोखू शकलो नाही. म्हणूनच मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांचे राजीनामा देतानाचे शब्द आहेत. काँग्रेस सरकार अनुसूचित जातींमधील लोकांची उपेक्षा करत असल्याचं बाबासाहेबांनी नमूद करून ठेवलं आहे. काँग्रेसची वागणूक पाहून बाबासाहेब आक्रोशित झाले होते.
हे ही वाचा >> “…तर आम्ही संसदीय लोकशाहीचं रक्षण करू शकणार नाही”, पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका; सभागृहात नेमकं काय घडलं?
पंतप्रधान मोदी म्हणाले, बाबासाहेबांनी काँग्रेसवर थेट हल्ला केल्यानंतर पंडित नेहरू यांनी बाबासाहेबांची राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली होती. त्यांनी षडयंत्र रचून बाबासाहेब आंबेडकर यांना लोकसभा निवडणुकीत पराभूतही केलं. हे काँग्रेसवाले एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी आंबेडकरांच्या पराजयाचा आनंद साजरा केला, त्यांनी जल्लोष केला. ही गोष्ट बाबासाहेबांनी एका पत्रात नमूद करून ठेवली आहे.