PM Modi Comment on Mini Skirt At National Creator Award: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नॅशनल क्रिएटर्स अवार्डमध्ये देशभरातील २० हरहुन्नरी इन्फ्लुएन्सर्सचा सन्मान केला. या पुरस्कार सोहळ्यासाठी स्वच्छता दूत ते हेरिटेज फॅशन, कला ते शिक्षण विविध विभागातून २० क्रिएटर्सची निवड करण्यात आली होती. पुरस्कार प्रदान करण्याआधी पंतप्रधान मोदींनी उपस्थितांसह संवाद साधला. मोदींनी भाषणाच्या वेळी आधुनिक मिनी स्कर्ट व कोणार्क मधील शिल्पकृतींचा संबंध जोडत केलेले एक विधान यावेळी विशेष ठरले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीतील भारत मंडपम येथे झालेल्या पहिल्या-वहिल्या राष्ट्रीय निर्माते पुरस्कार सोहळ्यात पंतप्रधान मोदींनी हे भाष्य केले. १९ वर्षीय जान्हवी सिंह हिला हेरिटेज फॅशन आयकॉन हा पुरस्कार देऊन मोदींच्या हस्ते गौरवण्यात आले. यासाठी मराठमोळी अभिनेत्री व युट्युबर उर्मिला निंबाळकर हिला सुद्धा नामांकन प्राप्त झाले होते. हा विशेष ज्युरी अवार्ड देताना पंतप्रधानांनी कोणार्कच्या ऐतिहासिक शिल्पाकृतीचा दाखला देत समकालीन फॅशन ट्रेंड आणि प्राचीन शिल्पकला यांच्यातील समांतर रेखाटत भारत हा सर्वच बाबींमध्ये कसा इतरांच्या पुढे आहे व एकाअर्थी ट्रेंड सेंटर आहे हे अधोरेखित केले.

मिनी स्कर्ट व पर्सबाबत मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान मोदी म्हणाले की, “अनेक लोक मिनी स्कर्टला आधुनिकतेचे प्रतीक मानतात. परंतु जर तुम्ही कोणार्कला गेलात, तर तुम्हाला शतकानुशतके जुन्या मंदिरांमधील शिल्पाकृतींमध्ये मिनी स्कर्ट आणि पर्सचे नमुने पाहायला मिळतील. यावरून हे दिसून येते की शेकडो वर्षांपूर्वीही त्या शिल्पकारांना फॅशनची जाण होती. सध्या रेडिमेड कपड्यांचा ट्रेंड आहे पण आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय पोशाखांची अधिक जाहिरात करायला हवी. “

तसेच जागतिक बाजारपेठेत भारतीय फॅशनसाठी प्रचंड क्षमता असल्याचे म्हणत मोदींनी भारताची अनोखी सांस्कृतिक ओळख जगाला दाखवू शकणाऱ्या पारंपारिक पोशाखाला नव्याने प्रसिद्धीच्या झोकात आणायचे आवाहन उपस्थितांना केले.

नॅशनल क्रिएटर अवॉर्ड्समध्ये मराठी क्रिएटर्सची वर्णी

दरम्यान, जान्हवी सिंह व्यतिरिक्त, कीर्तिका गोविंदासामी यांना सर्वोत्कृष्ट कथाकार म्हणून तर गायिका मैथिली ठाकूर यांना ‘वर्षातील सांस्कृतिक दूत’ म्हणून गौरवण्यात आले. तांत्रिक गुरुजी म्हणून प्रसिद्ध असलेले गौरव चौधरी यांना टेक श्रेणीतील सर्वोत्कृष्ट क्रिएटर तर ७५ हार्ड डेज चॅलेंजने प्रसिद्ध झालेल्या अंकित बैयनपुरिया – सर्वोत्कृष्ट आरोग्य आणि फिटनेस क्रिएटर पुरस्कार देण्यात आला. विजेत्यांमध्ये नमन देशमुख व मल्हार कांबळे या दोन मराठी चेहर्याचा सुद्धा समावेश आहे या दोघांना अनुक्रमे, शिक्षण श्रेणीतील सर्वोत्कृष्ट निर्माता पुरस्कार व स्वच्छता दूत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi comments on mini skirt purse says konark temple has sculpture wearing skirts at national creators award bharat mandpam svs
Show comments