दिल्लीत संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती यांच्या अभिभाषणावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत उत्तर दिले. लोकसभेनंतर सलग दुसऱ्या दिवशी पंतप्रधान यांनी संसदेत भाषण केले. लोकसभेनंतर राज्यसभेत केलेल्या भाषणातही पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसला जोरदार लक्ष्य केलं, सडकून टीका केली. स्वातंत्र्य मिळत असतांना काँग्रेस विसर्जित करा असं महात्मा गांधी यांनी म्हणाले होते. हे जर झालं असतं तर देशात काय झालं असतं हे सांगत काँग्रेसने केलेल्या चुकांचा पाढा मोदी यांनी भाषणात वाचला.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “काँग्रेस जर नसती तर ही लोकशाही घराणेशाही पासून मुक्त राहिली असती. हा देश विदेशी ऐवजी स्वदेशीच्या संकल्पावर चालला असता, आणीबाणीचा कलंक लागला नसता, देशात जातीयवाद राहिला नसता, शिख लोकांचे हत्याकांड झाले नसते, तिथे दहशतवाद नसता, काँग्रेस जर नसती तर पंडितांना काश्मिर सोडावं लागलं नसतं. काँग्रेस जर नसती तर सर्वसामान्य माणसांना मुलभूत सोईसुविधांसाठी वाट पहावी लागली नसती”, अशी टीका मोदी यांनी केली.
काँग्रेसने घराणेशाहीच्या पुढे कधी विचार केला नाही. देशाला सर्वात मोठा धोका हा घराणेशाही असलेल्या पक्षांपासून आहे. पक्षात जेव्हा एक कुटुंब प्रभावशाली बनते तेव्हा सर्वात पहिलं गुणवत्तेला लक्ष्य केलं जातं. सर्व पक्षांनी त्यांच्या त्यांच्या पक्षात लोकशाही अंमलात आणली पाहिजे, काँग्रेसने याचा सर्वात आधी याचा विचार केला पाहिजे अशी घणाघाती टीका मोदी यांनी काँग्रेसवर केली.
“मी गुजरातमध्ये मुख्यमंत्री होतो तेव्हा माझ्यावर किती अन्याय झाला, गुजरातवर पण केला झाला. गुजरातमध्ये मी नेहमी म्हणायचो देशाच्या विकासासाठी गुजरातचा विकास करा. काँग्रेस तर याआधी साध्या साध्या गोष्टींमुळे मुख्यमंत्र्यांना हटवत होते. काँग्रेसने आत्तापर्यंत जवळपास १०० वेळा निवडुन आलेल्या विविध राज्य सरकारला फेकून दिलं होतं, तेव्हा तुम्ही कोणत्या तोंडाने लोकशाहीबद्दल बोलत आहेत. एका पंतप्रधानांनी ५० राज्य सरकारला फेकून दिलं आहे. याचे उत्तर जनतेला द्यावे लागेल. आज त्यांची ते शिक्षा ते भोगत आहेत. कांँग्रेसच्या सत्तेच्या नशेमुळे आज तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये कटुता आली आहे”, अशी टीका मोदी यांनी काँग्रेसवर केली.