PM Modi Criticizes Arvind Kejriwal : येत्या काही आठवड्यांतच दिल्लीत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आम आदमी पार्टीसह प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. दोन्ही पक्षांनी आक्रमक होत ऐकमेकांवर जोरदार टीका सुरू केली आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील ‘झुग्गी-झोपरी’ क्लस्टरमधील १६०० फ्लॅट्स आणि दोन शहरी पुनर्विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. उद्घाटनावेळी पंतप्रधानांनी माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य करत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानावर जोरदार टीका केली.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दिल्ली सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी कोटींहून अधिक किमतीची उच्च दर्जाची उपकरणे आणि गॅझेट्स बसवले असल्याची माहिती दिली होती.त्यामुळे भाजपाने आप सरकारवर सडकून टीका केली होती. यानंतर आप सरकारने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानावर प्रमाणापेक्षा खर्च केल्याच्या आरोप झाले होते. हाच धागा पकडत पंतप्रधानांनी केजरीवाल यांना लक्ष्य केले.
अण्णा हजारेंना पुढे करत …
“मी सुद्धा शीशमहल (काचेचा बंगला) बांधू शकलो असतो, पण मोदींने स्वत:साठी कधीही घर बांधले नाही हे देशाला चांगल्या प्रकारे माहित आहे. मी गरिबांसाठी ४ कोटींहून अधिक घरे बांधली आहेत.गेल्या १० वर्षात दिल्लीला आपत्तीने वेढले आहे. अण्णा हजारे यांना पुढे करत काही अत्यंत बेईमान लोकांनी दिल्लीला आपत्तीत ढकलले आहे. आप आपदा बनकर दिल्ली पर टूट पडी है”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
दिल्ली विधानसभा निवडणूक
गेल्या ११ वर्षांत तीन वेळा दिल्ली विधानसभेची निवडणूक जिंकणाऱ्या आम आदमी पार्टीने आपली सत्ता राखण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच आम आदमी पार्टीने सर्व विधानसभा मतदारसंघातील आपले उमेदवार जाहीर केले असून, उमेदवारांनी निवडणुकीची तयारीही केली आहे. दुसरीकडे गेल्या १०-११ वर्षा देशातील अनेक राज्यांत सत्ता मिळणाऱ्या भाजपाला पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यापासून दिल्ली विधानसभेत सत्ता स्थापन करता आलेली नाही. त्यामुळे यंदा भाजपाने दिल्ली विधानसभा जिंकण्यासाठी जोर लावला आहे. दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नाहीत.
दुसरीकडे आम आदमी पार्टी सत्तेत येण्यापूर्वी सलग १५ वर्षे दिल्लीत राज्य केलेल्या काँग्रेसबरोबर इंडिया आघाडीत असूनही आम आदमी पार्टीने एकत्र निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाला भाजपाबरोबर काँग्रेसही घेरत असल्याचे पाहायला मिळत आहे.