PM Narendra Modi In Rajya Sabha : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत बोलले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासह काँग्रेसवर टीका केली. यावेळी ते म्हणाले, लता मंगेशकर यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांनी सावरकरांवरील कविता आकाशवाणीवर सादर करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांना काँग्रेस सरकारने आकाशवाणीतून कायमचे हद्दपार केले.
त्यांना आकाशवाणीतून कायमचे हद्दपार केले
पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल करत म्हटले की, “नेहरूजी पंतप्रधान होते, ते पहिले सरकार होते आणि मुंबईत कामगारांचा संप झाला होता. मजरूह सुलतानपुरी यांनी त्यात एक कविता गायली होती, यासाठी नेहरूजींनी त्यांना तुरुंगात पाठवले. बलराज साहनी यांनी एका मिरवणुकीत भाग घेतला, त्यांनाही तुरुंगात टाकण्यात आले. लता मंगेशकर यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी ऑल इंडिया रेडिओवर वीर सावरकर यांच्यावर एक कविता प्रसारित करण्याची योजना आखली होती, म्हणून त्यांना आकाशवाणीतून कायमचे हद्दपार करण्यात आले. इतकेच नव्हे तर. जेव्हा देव आनंद यांनी आणीबाणीला पाठिंबा दिला नाही म्हणून त्यांच्या चित्रपटांवर दूरदर्शनवरून बंदी घालण्यात आली होती.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत भाषण करताना म्हटले की, “देशातील लोकांनी आमच्या विकासाचे मॉडेल पाहिले, ते समजून घेतले आहे आणि पाठिंबा दिला आहे. आमचे विकासाचे मॉडेल आहे. २०१४ नंतर भारताला प्रशासनाचे पर्यायी मॉडेल मिळाले. हे मॉडेल तुष्टीकरणावर (लांगुलचालन) केंद्रित नाही तर समाधानावर केंद्रित आहे. काँग्रेसच्या काळात प्रत्येक गोष्टीत तुष्टीकरण होत होते. राजकारण करण्याची ही त्यांची पद्धत होती. काँग्रेस मॉडेलमध्ये एक कुटुंबच सर्वप्रथम येते.”
म्हणून आज काँग्रेची ही अवस्था
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, “जर आपण आता काँग्रेसचा अभ्यास केला तर लक्षात येईल की, त्यांनी अनेक सरकारे अस्थिर केली. ते याच कामात गुंतून राहिले. त्यांच्या या धोरणांमुळेच आज काँग्रेसची ही अवस्था झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेससोबत असलेले लोकही पळून जात आहेत.”